नवी दिल्ली - देशातील सर्व आरोग्य केंद्रे तसेच मोठ्या रुग्णालयांतील डॉक्टरांना आता स्ट्रोकपासून (आजारात येणारा झटका) रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी सरकारकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे देशात असंसर्गजन्य रोगांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने ग्रामीण आणि शहरी भागात काम करणा-या डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. लवकरच सर्व राज्यांमध्ये या उपक्रमाला सुरुवात होईल.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव अंशुप्रसाद यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, देशात दरवर्षी स्ट्रोकच्या प्रकरणात वाढ होत आहे. जर रुग्णांना याचे वेळेवर उपचार मिळाले तर त्यांना लकवा किंवा मानसिक आजारांचा सामना करावा लागू शकतो. या प्रकरणांशी संबंधित एका अधिका-याने सांिगतले की, ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना स्ट्रोकचा जास्त धोका असतो. यासाठी डॉक्टरांना स्ट्रोकसंबंधित लक्षणांबाबत माहिती दिली जाईल.
रुग्णात ही लक्षणे आढळल्यास त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयांत पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. स्ट्रोकची लक्षणे सीटी स्कॅन आणि अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून वेळेवर ओळखली गेल्यास त्या रुग्णाला वाचवता येऊ शकते.
लाखात २६२ रुग्ण
‘जर्नल ऑफ स्ट्रोक’मध्ये नुकत्याच प्रसिध्द करण्यात आलेल्या एका लेखानुसार देशात सध्या प्रति एक लाख लोकांमध्ये २६२ लोक या आजाराने ग्रस्त आहेत. शहरी भागांत हे प्रमाण ४२४ होते. इतर देशांच्या तुलनेत भारतासारख्या विकसनशील देशात स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये दहा टक्के वाढ दिसून आली आहे.