नवी दिल्ली - 1993 च्या मुंबई साखळी स्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच लपलेला असल्याचे सबळ पुरावे भारत सरकारला मिळाले आहेत. दाऊदचे फोटो आणि त्याच्या पाकिस्तानी पासपोर्टच्या कॉपी भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) ने मिळवली आहे. दाऊदच्या कुटुंबाशी संबधित ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स रॉच्या नेतृत्त्वातील संस्थांनी मिळवले आहेत. 23-24 ऑगस्टला जर भारताचे एनएसए अजित डोभाल आणि पाकिस्तानचे एनएसए सरताज अजिज यांच्यात चर्चा झाली तर भारत हे पुरावे त्यांना देणार आहे. गेल्या 22 वर्षांपासून दाऊद पाकिस्तानात असल्याचा भारताचा दावा पाकने फेटाळला आहे. एका वृत्तपत्राच्या रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे.
आता कसा दिसतो दाऊद..
दाऊदचे नवे फोटो आणि पुरावे मिळाल्याचा खुलासा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. गुप्तचर संस्थांना डॉनचे नवे फोटो मिळाले आहेत. त्यात दाऊदने क्लीन शेव्ह केलेले दिसून येत आहे. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसत आहेत. दाऊदने प्लास्टीक सर्जरी केली नसल्याचेही फोटोवरून स्पष्ट होत आहेत. काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये दाऊदने प्लास्टीक सर्जरीद्वारे चेहरा बदलला असल्याचे म्हटले होते. गुप्तचर संस्थांना दाऊद दुबईला गेल्याचे तिकिट आणि त्याच्या कुटुंबाचे फोटोही मिळाले आहेत. भारत सरकार लवकरच स्वतः दाऊदचे फोटो जाहीर करण्याची शक्यताही एका इंग्रजी वृत्तपत्राने व्यक्त केली आहे.
ठोस पुराव्यांमध्ये काय-काय मिळाले...
- भारताची गुप्तचरसंस्था रॉला दाऊदचा 2012 चा एक फोटो मिळाला आहे.
- दाऊदचे 3 पाकिस्तानी पासपोर्टही मिळाले आहेत.
- पण तिन्हीमध्ये दाऊदने वेगवेगळे पत्ते लिहिले आहेत.
- दाऊदची पत्नी मेहजबीन शेखच्या नावावर असलेले वीजबिलही मिळाले आहे. ते एप्रिल 2015 चे आहे.
- बिलावर D-13, ब्लॉक -4, कराची डेव्हलपमेंट अथॉरिटी, सेक्टर- 5, क्लिफ्टन हा पत्ता आहे.
कुटुंबाच्या ट्रॅवल डॉक्युमेंट्समध्ये काय हाती लागले...
- रॉ शिवाय भारताच्या इतर गुप्तचर संस्थांना मिळालेल्या पुराव्यांनुसार दाऊदच्या कुटुंबाने पाकिस्तान ते दुबईदरम्यान अनेकदा प्रवास केला आहे.
- कागदपत्रांनुसार, दाऊदची पत्ती मेहजबीन आणि मुलगी माजिया यावर्षी 4 जानेवारीला एमीरेट्स एअरलाइन्सत्या फ्लाइटने कराचीहून दुबईला गेल्या होत्या.
- त्याठिकाणाहून दाऊदची दुसरी मुलगी माहरुख आणि जावई जुनेद मियांदाद (पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादचा मुलगा) यांच्या बरोबर 11 जानेवारीला त्या परत आल्या.
- त्यानंतर दाऊदची पत्नी पुन्हा एकदा 19 पेब्रुवारीला दुबईला गेली आणि 26 फेब्रुवारीला परतली.
- दाऊदचा मुलगा मोइन, त्याची मुलगी सानिया आणि त्याच्या मुलांनीही मार्च ते मे 2015 दरम्यान अनेकदा कराची ते दुबईदरम्यान प्रवास केला.
- मोइन त्याची पत्नी सानिया आणि मुलांसह 30 मे 2015 ला दुबईहून पुन्हा कराचीला आला.
- भारतीय गुप्तचर संस्थांकडे दाऊदच्या कुटुंबातील सर्वांचे पासपोर्ट नंबर आणि एअर तिकिट्सचे डिटेल्स आहेत.
दाऊदचे चेलेही पाकिस्तानात ?
दाऊदचे अत्यंत जवळचे असे समजले जाणारे जाबेर सादीक, जावेद छोटानी आणि जावेद पटेल उर्फ चिकना हेही पाकिस्तानात आहेत. त्यावरूनच पाकचा खोटारडेपणा उघड होत आहेत. हे सर्वही दुबईहून पाकिस्तानात येत जात असल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट होते. जावेद चिकना यानेच टायगर मेमनच्या मदतीने मुंबईस्फोटांचा कट रचला होता. तो हवालाचे काम करतो. पाकची गुप्तचर संस्था ISI बरोबरदेखिल त्याचे चांगले संबंध आहेत.