नवी दिल्ली / हैदराबाद/ लखनऊ - रेल्वे भाडेवाढीच्या निर्णयाचे सरकारकडून समर्थन केले जात आहे. मात्र, त्याचबरोबर देशभरातील निदर्शनानंतर सरकारने सारवासारव केली आहे. सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी कडू औषध प्यावेच लागेल, असे मोदी सरकारने स्पष्ट आहे.
डिझेलचे दर कमी झाल्यास त्याचा फायदा रेल्वे प्रवाशांनाही दिला जाईल, असे रेल्वे बोर्डाने म्हटले आहे. संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू हैदराबादमध्ये म्हणाले, यूपीए सरकारने रेल्वे भाडेवाढीचा निर्णय आमच्यावर लादला होता. माजी रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खारगे यांनी तत्कालीन पंतप्रधानांना अंतरिम अर्थसंकल्पाआधी भाडेवाढीसाठी मंजुरी मागितली होती. भाडेवाढ कडू औषधाप्रमाणे आहे. सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी हे औषध घ्यावे लागेल. दरम्यान, रेल्वे बोर्डाचे चेअरमन अरुणेंद्र कुमार म्हणाले, डिझेलचे दर कमी होत असतील, तर त्याचा लाभ प्रवाशांना दिला जाईल. रेल्वेने शुक्रवारी प्रवासी व माल भाड्यात अनुक्रमे 14.2 आणि 6.5 टक्के वाढ केली.
सरकारचा युक्तिवाद
यूपीएने 10 वर्षांमध्ये 12 हजार रेल्वेची घोषणा केली होती. मात्र, त्यापैकी चार हजार सुरू होऊ शकल्या. उर्वरित रेल्वेंसाठी निधीची आवश्यकता आहे. पाच लाख कोटी रुपये केवळ जुन्या योजनांसाठीच लागतात. रेल्वे बोर्डाचे चेअरमन कुमार म्हणाले, 2002 पासून भाडेवाढ झाली नाही. त्यामुळे वाढ आवश्यक होती.
विरोधकांचा सूर
दिल्ली काँग्रेसने रेल्वेच्या भाडेवाढीविरोधात रविवारी निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रेल रोको
आंदोलन केले.
जेटली यांच्यावर निशाणा
माकपा नेत्या वृंदा करात म्हणाल्या, एनडीएला यूपीएची धोरणे पुढे नेण्यासाठी जनादेश मिळाला की काय, असे वाटते. अरुण जेटली माजी पंतप्रधानांच्या भाषेत बोलत आहेत.
उद्धव मोदींना भेटणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मोदींची भेट घेणार असल्याचे सांगितले.
भ्रष्टाचार का कमी केला नाही?
आपचे प्रमुख अरविंद
केजरीवाल म्हणाले, रेल्वेत खूप भ्रष्टाचार आहे. सरकारने भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी पावले उचलली असती, तर भाडेवाढ करण्याची आवश्यकता भासली नसती.
पुढील स्लाइडमध्ये, भाडेवाढीविरोधात रस्त्यावर उतरलेले कार्यकर्ते