नवी दिल्ली - गुंतवणूकदाराचे पैसे परत न दिल्यामुळे सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय सध्या तुरुंगात आहेत. यांची पत्नी स्वप्ना आणि मुलगा सुशांतो यांनी मॅसेडोनिया गणराज्याचे नागरिकत्व स्विकारल्याची चर्चा आहे. काळ्या पैशाबाबत केंद्र सरकारने हाती घेतलेल्या मोहिमेमुळे कित्येक उद्योगपती मॅसेडोनिया गणराज्याचे नागरिकत्व स्विकारत असल्याची माहिती समोर आली आहे.
गुंतवणूकदारांना नागरिकत्व बहाल करतो हा देश
युरोपच्या आग्नेय दिशेला असलेला मॅसेडोनिया हा देशी- विदेशी उद्योजकांना गुंतवणूकीसाठी आकर्षित करतो. त्या व्यावसायिकांना आपल्या देशाचे नागरिकत्व बहाल करतो. माध्यमांच्या अहवालानुसार जो उद्योजक चार लाख युरोपेक्षा जास्त गुंतवणूक करेल आणि कमितकमी 10 लोकांना नोकरी देणार असेल अशा उद्योजकांना नागरिकत्व देण्यात येते. याशिवाय जो परदेशी नागरिक किंवा उद्योजक या देशामध्ये स्थावर मालमत्तेमध्ये 40 हजार युरोपेक्षा जास्त गुंतवणूक करतो त्यास या देशामध्ये एक वर्ष राहण्याचा अधिकार मिळतो.
सहाराचे संबंध चांगले
सहारा उद्योगसमुहाचे प्रमुख सुब्रतो राय यांचे मॅसेडोनियासोबत चांगले संबंध आहेत. त्यांनी काही मदर तेरेसाचा मोठा पुतळा उभारण्यासाठीही तेथे प्रयत्न केले होते आणि कॅसिनो स्थापन करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे.
सहारा ग्रुपने म्हटले हे जुनेच प्रकरण
एका न्यूज वेबसाईटने प्रसिध्द केलेल्या माहितीनुसार, सहारा ग्रुपच्या जनसंपर्क अधिका-यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले की, 'हे प्रकरण तब्बल तीन वर्षांपूर्वीचे आहे. खूप सारे उद्योजक मॅसेडोनियाचे नागरिकत्व स्विकारत आहेत'.