आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subrata Roy News In Marathi, Supreme Court, Sahara Group

दीड लाख कोटींचे मालक सुब्रतो रॉय यांची सर्वोच्च न्यायालयाने केली तिहार तुरुंगात रवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दीड लाख कोटींचे मालक असलेले 65 वर्षीय ‘सहारा’ प्रमुख सुब्रतो रॉय यांची सर्वोच्च न्यायालयाने अखेर तिहार तुरुंगात रवानगी केली. गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी परत करण्याचा फॉर्म्युला सांगितला जात नाही, तोपर्यंत कैदेत राहा, असे स्पष्ट करून कोर्टाने अभूतपूर्व कठोर निर्णय दिला. प्रकरणाची पुढील सुनावणी 11 मार्चला होईल.


मंगळवारी सुब्रतो रॉय यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात हजर केले. न्यायालयात पोहोचताच स्वत:ला सहाराश्री असे बिरूद लावणारे सुब्रतो रॉय यांनी 26 फेब्रुवारी कोर्टात हजर न राहिल्याबद्दल न्यायमूर्ती एस. राधाकृष्णन आणि न्यायमूर्ती जे.एस. खेहर यांच्या पिठाची हात जोडून माफी मागितली. त्यावर पीठ म्हणाले, आम्ही तुमचा आदर करतो, परंतु तुम्ही आमचा आदर राखण्यात असमर्थ ठरलात. त्यावर स्वत:च आपली बाजू मांडताना रॉय म्हणाले, सहारा आपली संपत्ती विकून पैसे परत करेल. दोन महिन्यांचा वेळ द्यावा. त्यावर कोर्ट म्हणाले, तुमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवता येणार नाही. तुमच्याकडे पैसे परत करण्याचा काय फॉर्म्युला आहे ? त्यावर रॉय लगेच उत्तर देऊ शकले नाहीत आणि थोडा वेळ त्यांनी मागितला. त्यावर कोर्टाने त्यांना तिहार तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. रॉय यांच्यासोबत त्यांच्या कंपनीचे दोन संचालक अशोक रॉयचौधरी आणि रविशंकर दुबे यांनाही कोर्टाने तुरुंगात पाठवले.


असा आहे सहारा परिवार
रु. 1.50 लाख कोटींचा संपूर्ण परिवार
4799 कार्यालये, हॉटेल, मॉल्स
11 । लाख कर्मचारी, कार्यकर्ते.
10 हून अधिक क्षेत्रात कारभाराचा विस्तार


परदेशातही मोठ्या हॉटेलांची खरेदी
@2010 मध्ये लंडनमध्ये 3500 कोटींत हॉटेल ग्रॉसव्हेनॉर हाऊस विकत घेतले.
@ 2012 मध्ये न्यूयॉर्कमध्ये 3100 कोटींत प्लाझा हॉटेलची खरेदी.
@ 2012 मध्ये न्यूयॉर्कमध्ये 1200 कोटींत ड्रीम हॉटेलची खरेदी.
कंपनीचे मुख्यालय लखनऊमध्ये. 200 हून अधिक एकरांवर सहारा शहरही.


कसे परत करणार, हे सांगा
तोपर्यंत तुम्ही तुरुंगात जा
- सर्वोच्च न्यायालय


कोर्ट रूममध्ये सुब्रतो रॉय % कधी हात जोडत होते, कधी विनंती करत होते
सुब्रतो रॉय : मी राष्ट्रभक्त आहे. माझे 12 लाख कर्मचारी आहेत, माफी द्या.
रॉय यांनी न्यायमूर्तींसमोर हात जोडले आणि म्हणाले, सहारा कंपनीत 12 लाख कर्मचारी आहेत. 37 वर्षांत माझ्यावर कसलाही डाग नाही. मी राष्ट्रभक्त आहे. मी काही वैध कारणांमुळेच 26 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहू शकलो नव्हतो. मला माफ करा.
जज म्हणाले, आम्ही तुमचा आदर करतो. परंतु तुम्ही आमचा आदर केला नाही.


सुब्रतो रॉय- पैसे परत करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा तरी वेळ द्या
सेबीला पैसे परत करण्यासाठी उद्यापासूनच संपत्ती विकली जाईल. पैसे परत करण्यासाठी थोडा कालावधी द्या. कमीत कमी दोन महिने. तीन-चार महिन्यांत बँक गॅरंटीदेखील देऊ.
जज म्हणाले, आम्हाला तुमच्या संपत्तीशी काही देणे-घेणे नाही. तुम्ही दोन वर्षांपासून हीच गोष्ट सांगत आहात. तुम्ही गंभीर नाहीत.
सुब्रतो रॉय- आम्ही सेबीला 5 हजार कोटी रुपये दिले, त्याचे अजूनपर्यंत वाटप झालेले नाही
सुब्रतो रॉय म्हणाले, गुंतवणूकदारांना देण्यासाठी 5 हजार कोटी रुपये दिले होते. परंतु सेबीने 15-16 महिने उलटूनही यातील एक कोटीदेखील अद्याप वाटप केलेले नाही.
जज म्हणाले, ते आम्ही पाहून घेऊ. परंतु तुम्ही रोखीने पैसा परत करू शकत नाहीत. चेक किंवा डीडीने पैसा परत करा.
सुब्रतो रॉय- विश्वास ठेवा. मी तुम्हाला पैसा परत करतो.
जज म्हणाले, ही तुमची डोकेदुखी आहे, तुम्हालाच ठाऊक. आम्हाला तुमच्याकडून काही घेण्याची गरज वाटत नाही. असे कसे बोलताय ?
सुब्रतो रॉय- मी माफी मागतो. मी असे म्हणायला नको होते. माझी जीभ घसरली.


दिवसभराच्या घडामोडी
12.55 वाजता : सहारा प्रमुखांना सुप्रीम कोर्टात आणण्यात आले. गुंतवणूक असलेल्या एका व्यक्तीने त्याच वेळी सुब्रतो यांच्यावर शाई फेकली.
1.50 : सुब्रतो रॉय यांना कोर्ट नंबर सातमध्ये आणण्यात आले.
2.05 : कोर्टाची कार्यवाही सुरू. सुब्रतो यांनी कोर्टाची माफी मागितली.
3.50 : सुब्रतो यांना कोठडीत ठेवण्याचे कोर्टाचे आदेश. कार्यवाही संपली.
6.00 : कागदपत्रांची प्रक्रिया संपली. तोपर्यंत सुब्रतो रॉय कोर्टातच राहिले. नंतर त्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले.
36, 631
एकर जमिनीचे मालक
5, 353
एकर जमीन मॅसाडोनियात
54, 364
कोटी रुपयांची देणी.


महाघोटाळा ?
1.कोर्ट आपल्या आदेशात म्हणाले, तपास करणा-या संस्थांच्या अहवालात मोठ्या प्रमाणातील गुंतवणूकदार अस्तित्वातच नसल्याचे नमूद आहे. ही बाजाराची फसवणूक आहे.
2. सहाराच्या दोन कंपन्यांनी सुमारे दोन कोटी गुंतवणूकदारांकडून 25 हजार कोटी वसूल केल्याचे विविध अहवालांत म्हटले आहे. यातील बहुतेक गुंतवणूकदारांची नावे, पत्ता सर्व खोटे आहेत. सहाराच्या म्हणण्यानुसार तर यातील 6 हजार गुंतवणूकदार कलावती नावाचेच आहेत. अर्थात ते बोगस आहेत.


काय होईल ?
1. सुब्रतो 11 मार्चपूर्वी पैसे परत करण्याचा फॉर्म्युला सादर करून सुनावणीसाठी कोर्टाचे मन वळवू शकतात.
2. दोनसदस्यीय पीठाच्या आदेशाला मोठ्या पीठासमोर आव्हान देण्यासाठी अपील करू शकतात.
3. जर 11 मार्चलाही ते कोर्टाचे समाधान करू शकले नाहीत तर कोर्ट त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी करू शकते.