आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subsidised LPG Cylinder Quota To Be Increased To 12 Moily

राहुल इम्पॅक्ट : आता वर्षाला मिळणार 12 स्वस्त सिलिंडर, पेट्रोलियम मंत्री मोईलींची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 'राहुल बोले आणि सरकार हाले' याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि युपीए सरकारने स्वस्त सिलिंडरचे कार्ड खेळले आहे. महागाईच्या ओझ्या खाली दबलेल्या जनतेला आणि मध्यमवर्गाचा जनाधार मिळविण्यासाठी केंद्र सरकारने अनुदानित सिलिंडरचा वर्षाचा कोटा नऊ ऐवजी 12 करण्याची घोषणा केली आहे.
आज (शुक्रवार) झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सिलिंडरचा कोटा वाढवण्याची पंतप्रधानांकडे जाहीर मागणी केली होती. राहुल गांधी यांचे भाषण संपल्यांनतर पुढच्या काही क्षणांमध्येच पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी घरगुती वापराच्या अनुदानित सिलिंडरचा कोटा वाढवला जाईल अशी घोषणा केली आहे. वाढीत तीन स्वस्त सिलिंडर देण्याची औपचारिक घोषणा कॅबिनेट बैठकीत केली जाणार आहे.
विशेषम्हणजे दोन आठवड्यांपू्वी जेव्हा मोईली यांना विचारण्यात आले होते, की अनुदानित सिलिंडरचा कोटा वाढवण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे का. तेव्हा त्यांनी असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले होते. मात्र, 13 जानेवारी रोजी ते म्हणाले होते, की जर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग किंवा राहुल गांधी यांनी जर याबद्दल विचारणा केली तर विचार केला जाईल. आज झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी म्हणाले, 'पंतप्रधान महोदय 9 सिलिंडरमध्ये आमचे काम भागत नाही. आमच्या महिला भगिनींना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. स्वस्त सिलिंडरची संख्या वर्षाला 12 करा.'
राहुल गांधी यांनी ही मागणी केल्यानंतर पुढच्या काही क्षणातच पेट्रोलियम मंत्री मोईली यांनी अनुदानित सिलिंडरचा कोटा वाढवण्याची घोषणा करुन राहुल यांची मागणी तत्काळ पूर्ण केली आहे. मात्र, ही काही पहिली वेळ नाही. याआधी गुन्हेगार नेत्यांना वाचवणारा अध्यादेश फाडून फेकण्याच्या लायकीचा असल्याचे राहुल यांनी पत्रकार परिषदेत म्हटल्यानंतर राष्ट्रपतींच्या संमतीसाठी गेलेला अध्यादेश केंद्र सरकारने परत घेतला होता. त्यानंतर आदर्श घोटाळ्याचा चौकशी अहवाल फेटाळणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचा निर्णय दिल्लीतून मुंबईत आल्यानंतर फिरवला होता.