नवी दिल्ली - ऊस उत्पादक शेतक-यांना साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार भाव देण्यासंदर्भात येत्या कॅबिनेटच्या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी सर्वपक्षीय शिष्टमंडळास दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जेटली आणि केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह माहिते पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, राजू शेट्टी, संजय काका पाटील, श्रीकांत शिंदे आदींचा समावेश होता. उसाला भाव देण्यासंदर्भात २१ जानेवारीपूर्वी निर्णय घेऊ, असे आश्वासन जेटली यांनी दिले.