आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sumitra Mahajan Angry, Slams Congress Over Lok Sabha Disruption

अँडरसनला पळून जाण्यास राजीव गांधींनी मदत केली, सुषमा स्वराज यांचा पलटवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'मी कोणतीही चूक केलेली नाही. तसेच कोणतेही काम लपूनछपून केलेले नाही. ना कोणालाही पळून जाण्यास मदत केली, असे ललित मोदीप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कॉंग्रेसच्या प्रश्नाला सदनात उत्तर दिले. सुषमा स्वराज यांनी सांगितले की, ललित मोदींच्या पासपोर्ट प्रकरणात माझे पती वकील नव्हते. माझी मुलगी या प्रकरणात नवव्या क्रमांकाची ज्युनिअर वकील होती. त्यामुळे मुलीने मोदींकडून एक रुपयाही घेतलेला नाही.

काँग्रसनेच बोफोर्स घोटाळ्यातील आरोपी क्वात्रोचीला पळून जाण्यास मदत केली होती. त्याचबरोबर भोपाळ दुर्घटनेतील हजारो लोकांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या अँडरसनला पळून जाण्यास दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींनी मदत केल्याचे सांगून सुषमा स्वराज यांचा कॉंग्रेसवर पलटवार केला. अँडरसनला भारताबाहेर पळून जाण्यास मदत करण्याच्या बदल्यात 35 वर्षांच्या तुरूंगावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आदिल शहरयार याची सुटका करण्याचे अमेरिकेने कबूल केल्याचे सुषमा स्वराज यांनी यावेळी सांगितले. आदिल शहरयार हा राजीव गांधींच्या बालपणीच्या मित्राचा मुलगा आहे. राहुल गांधी यांनी सुट्टीत आपल्या कुटुंबाचा इतिहास वाचावा, असा टोला देखील सुषमा यांनी लगावला आहे.

सोनिया गांधींच्या भगिनीविषयी अभद्र शब्द
वादग्रस्त ललित मोदीप्रकरणी स्थगन प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान भाजपचे अलिगडचे खासदार दुष्यंत गौतम यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भगिनीविषयी अभद्र शब्द वापरले. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस सदस्यांनी लोकसभेत जोरदार गोंधळ घातला. वादग्रस्त विधानाबद्दल भाजपने माफी मागावी, अन्यथा सदनाचे कामकाज चालू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेसने घेतल्याने कामकाज पुन्हा तहकूब करण्यात आले.

ललित मोदी प्रकरणावर काँग्रेसने बुधवारी सभागृहात स्थगन प्रस्ताव सादर केला. त्यावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला धारेवर धरले. खरगे बोलत असताना भाजपचे अलिगडचे खासदार दुष्यंत गौत्तम यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भगिनीविषयी अभद्र शब्द वापरले. त्यावर काँग्रेसचे सर्व सदस्य संतापले.

सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी लोकसभा सभापतींसमोरील मोकळया जागेत येऊन जोरदार गदारोळ घालण्यास सुरूवात केली. अखेर या गोंधळातच सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे अखेरचे तीन दिवस शिल्लक आहे. प्रचंड गोंधळात अखेर विरोधकांनी लोकसभेत चर्चेसाठी तयारी दर्शवली. लोकसभेत ललित मोदी प्रकरणी नियम 61 नुसार कॉंग्रेसने मांडलेल्या कार्यस्थगन प्रस्ताव चर्चा सुरु झाली आहे.

सुषमा यांचे ललित मोदींसोबत आर्थिक साटेलोटे
कॉंग्रेसचे नेते मल्लिकाअर्जुन खरगे यांनी सरकारला धारेवर धरले. खरगे यांनी सत्ताधारी भाजप पक्षावर घणाघाती प्रहार केला. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) सुमारे 460 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेल्या ललित मोदींना सुषमा स्वराज यांनी मदत का केली? याचे भाजपने उत्तर द्यावे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे ललित मोदींशी आर्थिक साटेलोटे असल्याचा आरोपही खरगे यांनी यावेळी केला. खरगे यांच्या भाषणावर भाजपच्या खासदारांनी आक्षेप घेतला.
ललित मोदींच्या आजारी पत्नीला मदत करण्यासाठी सुषमा स्वराज यांनी कायदा गुंडाळून ठेवायची काय गरज होती काय? असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला. ललित मोदी आलिशान रिसॉर्टमध्ये, युरोपीय देशांमध्ये सुट्टी घालवत होते, त्यांना तुम्ही माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत कशी केली? ज्या व्यक्तीला तुम्ही माणुसकीच्या दृष्टीकोनातून मदत केली, त्याची प्राथमिकता हे त्याच्या आजारी पत्नीवरील उपचार नव्हते तर इतर गोष्टी होत्या. चिदंबरम यांनी ब्रिटनशी केलेला पत्रव्यवहार प्रसिद्ध करा. जर सुषमा स्वराज यांना मोदींना मदत करायची होती तर त्यांनी मोदींना भारतात बोलवायला हवे होते. उच्चायुक्त, सेक्रेटरी कोणालाही न कळवता सुषमा यांनी मोदींना मदत केली. कायद्याचे उल्लंघन करत मदत करणे हा मोठा गुन्हा असल्याचे खरगे यांनी सांगितले.परराष्ट्र मंत्र्यांनी मोदींच्या पासपोर्टविरोधात कोर्टात अपील का केले नाही? तसेच ज्या व्यक्तीविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली, त्यांना स्वराज यांनी मदत केलीच कशी? असा सवाल खरगे यांनी उपस्थित केले.
पंतप्रधान फक्त रेडिओ, टीव्हीवरच बोलतात...
लोकसभेतील गोंधळाला सरकारच जबाबदार आहे. सरकार याआधी चर्चेला तयार झाले असले ते संसदेचा अमुल्य वेळ वाया गेला नसता, असा आरोप खरगे यांनी भाजपव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त रेडिओ, टीव्हीवरच बोलतात, सदनात का नाही? असाही सवाल खरगे यांनी केला.
दरम्यान,लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी 'ललितगेट' प्रकरणी चर्चा करण्यासाठी कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना प्रश्नोत्तरानंतर अडीच तासांचा वेळ दिला आहे.

कामकाज सुरु होताच कॉंग्रेसने ललित मोदीप्रकरणी स्थगन प्रस्ताव सादर करून लोकसभेत चर्चा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रचंड गदारोळ झाला होता. खरगे यांनी 'ललितगेट' ऐवजी 'मोदीगेट' शब्दप्रयोग केल्याने सत्ताधारी भाजप पक्षाने गदारोळ केला होता. त्याचबरोबर सुमित्रा महाजन यांनी देखील 'मोदीगेट' या शब्दावर आक्षेप नोंदवला होता.

दरम्यान, ललितगेट प्रकरण व मध्यप्रदेशातील बहुचर्चित व्यापमं घोटाळाप्रकरणी बुधवारी देखील लोकसभेच्या कामाकाजाला गोंधळात सुरुवात झाली. कॉंग्रेसने लोकसभेत स्थगन प्रस्ताव सादर केला. कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा प्रस्ताव स्विकारा मी कोणत्याही चर्चेस तयार असल्याचे केंद्रीय परराष्‍ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभा अध्यक्षांना विनंती केली. तसेच चर्चे सुरु करण्‍यासाठी सुषमा यांनी विरोधकांसमोर अक्षरश: हात जोडले.