नवी दिल्ली - लेफ्टनंट जनरल दलबीर सिंग सुहाग यांच्या नियोजीत लष्करप्रमुख निवडीला आव्हान देणा-या याचिकेवरील सुनावणी लवकर करण्यास सुप्रीम कोर्टाने होकार दर्शवला आहे. विद्यमान लष्करप्रमुख विक्रमसिंह यांच्या निवृत्तीनंतर लेफ्टनट जनरल सुहाग 1 ऑगस्टपासून कार्यभार सांभाळणार आहेत. मात्र, लेफ्टनंट जनरल रवि दास्ताने यांनी सुहाग यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. लेफ्टनंट जनरल सुहाग यांची नियुक्ती पक्षपातीपणाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या याचिकेवर आता पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे.
लेफ्टनंट जनरल रवि दास्ताने यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सप्टेंबरमध्ये सुनावणी घेण्याचे निश्चित केले होते. मात्र, दास्ताने 31ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. तर लेफ्टनंट जनरल सुहाग 1 ऑगस्ट रोजी लष्करप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती दास्ताने यांच्या वकिलांनी केली. सुटीच्या काळातील न्यायालयाच्या पीठाचे न्यायाधिश विक्रमजीत सेन यांनी दास्ताने यांच्या याचिकेची सुनावणी जुलैमध्ये घेण्याचे निश्चित केले आहे.
याचिकेमध्ये सुहाग यांची लष्करप्रमुख म्हणून निवड करण्याला आव्हान देण्यात आले आहे. जर ही निवडच न्यायालयाने रद्द ठरविली तर त्यांची नियुक्तीही रद्द होईल, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले. जुलैच्या दुस-या आठवड्यात या याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार आहे.