नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने आज (गुरुवार) सीबीआयचे संचालक रंजीन सिन्हा यांना म्हटले, की 2G स्पेक्ट्रम घोटाळाच्या चौकशीपासून तुम्ही दूर राहा. सिन्हा यांना या चौकशीपासून दूर ठेवण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हा आदेश दिला आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि वरिष्ठ वकिल प्रशांत भुषण यांनी आरोप केले होते, की या घोटाळ्यातील आरोपी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी सिन्हा यांच्या निवासस्थानी भेटायला येतात.
यापूर्वी या प्रकरणी सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. कोर्टाने आज या अधिकाऱ्यांना कोर्टाच्या परिसरातून जाण्यास आणि कार्यालयात काम करण्यास सांगितले. सिन्हा यांच्यासंदर्भात सुनावणी असल्याने हे अधिकारी कोर्ट परिसरात उपस्थित होते. यावेळी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एच. एल. दत्तू म्हणाले, की एवढ्या मोठ्या संख्येने अधिकारी येथे का उपस्थित आहेत? येथे एवढ्या अधिकाऱ्यांची गरज नाहीये. तुम्ही येथे वेळ वाया घालवू नका. कार्यालयात जाऊन काम करा.
सीबीआयचे संयुक्त संचालक अशोक तिवारी यांनी सीबीआयचे वकील के. के. वेणुगोपाल यांना मदत करणारे गोपाल शंकर नारायण यांना सांगितले, की या प्रकरणी वेणुगोपाल बाजू मांडणार नाहीत.
वेणुगोपाल यांनी कोर्टाला सांगितले, की सीबीआयने गुरुवारी त्यांना सल्ला दिला आहे, की आता सीबीआयची बाजू ते मांडणार नाहीत. मला ही माहिती नारायण यांनी दिली आहे.
यानंतर सुप्रीम कोर्टाने रंजित सिन्हा यांचे वकील विकाससिंह यांना विचारले, की हे तिवारी कोर्टात का उपस्थित आहेत आणि ते सिन्हा यांचे माऊथपिस आहेत का? यादरम्यान, न्यायालयाने सीबीआय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
यावर विकाससिंह म्हणाले, की वेगवेगळ्या फायलींवर स्पष्टीकरण देण्यासाठी हे अधिकारी उपस्थित आहेत. यावर मुख्य न्यायाधीश म्हणाले, की मी यांना बोलवलेले नाही. जर मला स्पष्टीकरणाची गरज असेल तर त्यांना बोलवले जाईल.