आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Dismisses Devinderpal Singh Bhullar\'s Pardon Plea

भुल्लरच्या फाशीचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खलिस्तानी अतिरेकी भुल्लरला फाशीच

वृत्तसंस्था । नवी दिल्ली
दिल्लीत 1993 मध्ये बॉम्बस्फोट घडवणारा खलिस्तानवादी अतिरेकी देविंदरसिंग भुल्लर याच्या फाशीवर सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. त्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी 2011 मध्ये फेटाळला होता. मात्र, अर्जावरील निर्णयास झालेल्या विलंबाचा भुल्लरच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद कोर्टाने अमान्य केला. या निकालामुळे भुल्लरसह 16 अन्य दोषींना फासावर लटकावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्वांचे दयेचे अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळले आहेत.

19 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या भुल्लर याने दयेचा अर्ज राष्‍ट्रपतींकडे दाखल केल्यानंतर सहा वर्षांनी यावर निर्णय झाला होता. या विलंबाचा आधार घेत भुल्लर याने याविरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील केले. आपल्याला याआधारे फाशीऐवजी जन्मठेप देण्यात यावी, अशी याचनाही भुल्लरने केली होती. भुल्लरच्या याचिकेवरील निकालानंतर आता उर्वरित दोषींची सुनावणी होणार आहे.


केव्हा काय?
० 1993 मध्ये दहशतवादविरोधी फ्रंट प्रमुख मनिंदरजितसिंग बिट्टा यांच्यावर कार बॉम्बस्फोटाने हल्ला करण्यात आला. यात 9 लोक मृत्युमुखी पडले.
० नंतर भुल्लर जर्मनीत पळून गेला. 1994 मध्ये भारतात परत आणले. 2001मध्ये कोर्टाने त्याला फाशी सुनावली.
० 2002 मध्ये त्याची ही शिक्षा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली. याच वर्षी त्याची पुनर्विचार याचिकाही फेटाळण्यात आली.
० 2003 मध्ये भुल्लरने राष्टÑपतींकडे दयेचा अर्ज दाखल केला. मात्र, 2011 मध्ये तो राष्टÑपतींनी फेटाळला.
० 2011 मध्ये निर्णयास विलंब झाल्याचे कारण दाखवून भुल्लर याने माफीसाठी सुप्रीम कोर्टात अपील केले होते.


मनिंदरजितसिंग बिट्टा यांचे आपल्याच पक्षावर आरोप
सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी 15 वर्षांत वेळ दिली नाही. त्यांचे सचिव कुणालाच त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. उलट भुल्लरची पत्नी व आईची मात्र सोनियांशी भेट होते. मी दोषींची नावे जरी सांगितली तरी त्या मला भेटू इच्छित नाहीत.

शीला दीक्षित यांच्या सरकारने भुल्लर याला मनोरुग्ण असल्याचे जाहीर केले आहे. हा त्याला वाचवण्यासाठी चालू असलेला आटापिटा आहे.

कपिल सिब्बल अतिरेक्यांच्या बाजूने खटले लढण्यासाठी कोर्टात उतरले. उघड आहे, सरकारी लोकच अतिरेक्यांना वाचवत होते.

अंबिका सोनी यांनी मला भुल्लर खटला मागे घ्यावा, असे सुचवले होते. एवढेच नव्हे, अफझल गुरूला फाशी दिल्यानंतर वक्तव्ये करू नका असे सांगितले होते.

काँग्रेस माझा पक्ष आहे. मात्र, दहशतवादविरोधी लढ्यात पक्षाने मला कायम दूर लोटले. कोणीही माझ्या मदतीसाठी पुढे आला नाही. आता नंतरची लढाई राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना शिक्षा ठोठावण्यासाठी असेल.
सरकारचे प्रयत्न पाहता असे वाटते की, कोणत्याही परिस्थितीत भुल्लर याला वाचवण्याचा सरकारचा उद्देश होता. त्याची फाइल पंधरा वर्षे मंत्रालयात फिरत होती.