नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने लेफ्टनंट जनरल दलबीर सिंह सुहाग यांच्या भावी लष्करप्रमुखपदाच्या नियुक्ती प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्यास तयारी दर्शविली आहे. त्यांच्या नियुक्तीस आव्हान देणा-या याचिकेवर जुलैच्या दुस-या आठवड्यात सुनावणी होणार आहे.
लेफ्टनंट जनरल सुहाग यांच्याविरुद्ध लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने यांनी याचिका दाखल केली आहे. नियुक्तीमध्ये भेदभाव झाल्याचा आरोप दास्ताने यांनी केला आहे. या याचिकेवर 1 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र, सुहाग 1 ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारणार असल्यामुळे त्याआधी सुनावणी होणे अपेक्षित होते. यावर न्या. विक्रमजित सेन यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सप्टेंबरऐवजी जुलैमध्ये सुनावणी ठेवण्याचा निर्णय घेतला. जनरल सिंह यांच्या निवृत्तीनंतर दलबीर सुहाग या पदावर विराजमान होतील.