नवी दिल्ली - द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबांच्या पूजेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर उद्भवलेल्या वादात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पीठासमोर साईधाम चॅरिटेबल ट्रस्टने दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी झाली. अशा मुद्द्यांवर जनहित याचिका म्हणून सुनावणी करता येणार नाही.
साईबाबांची पूजा करण्याच्या
आपल्या हक्कावर गदा येत आहे अथवा साईबाबांची निंदा करणारी वक्तव्ये करण्यात आली आहेत असे वाटत असेल, कायद्याचे उल्लंघन झाले असे वाटत असेल तर स्वामी स्वरूपानंद आणि त्यांच्या अनुयायांच्या विरोधात भाविक दिवाणी अथवा फौजदारी खटला दाखल करू शकतात, असे पीठाने म्हटले आहे.
साईबाबा मंदिरांसह महाराष्ट्रातील विविध मंदिरांचे व्यवस्थापन पाहणा-या साईधाम चॅरिटेबल ट्रस्टने ही जनहित याचिका दाखल केली होती. साईबाबा यांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्ये करण्यापासून शंकराचार्य आणि त्यांच्या अनुयायांना रोखण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत तसेच देशभरातील कोणत्याही मंदिरांतून साईबाबांची मूर्ती हटवण्यापासून त्यांना रोखावे, अशी मागणी ट्रस्टने केली होती.