आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सुब्रतो रॉय! बस्स! आता सुटका हवी असेल तर रक्कम भरा’:SC, अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सहारा समूहास मोठा झटका दिला. गुंतवणूकदारांना परत देण्यासाठी ५०९२ कोटी रुपये जमा न केल्यास न्यायालयाने  सहाराचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख असलेला अॅम्बी व्हॅली प्रकल्प लिलावात काढण्याचे आदेश दिले.
 
सुमारे ३४ हजार कोटी रुपयांची मालमत्ता आहे. न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या अवसायक अधिकाऱ्यास लिलावाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही दिले.  सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना ४८ तासांत आपल्या संपत्तीचे विवरण सादर करावे लागेल.

न्यायालयाने सुब्रतो रॉय सहारा यांना फटकारले. न्या. दीपक मिश्रा यांच्या पीठाने म्हटले :  आता खूप झाले! आज तुम्ही काहीही सांगाल. उद्या इन्कार कराल. ते चालणार नाही. रक्कम द्यायची नसेल तर तुरुंगात जायची तयारी ठेवा. मानवी दृष्टिकोनातून दिलेल्या पॅरोलचा आणि न्यायालयाने दाखवलेल्या उदारपणाचा तुम्ही गैरवापर केला आहे. न्यायालयाने सुब्रतो रॉय यांना हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाची कार्यवाही लाइव्ह ....
सहाराचे वकील खुर्शीद म्हणाले : अॅम्बी व्हॅलीचा लिलाव करू नका. न्यायालयाने म्हटले : ठीक आहे, मग सुब्रतो रॉयला आम्ही तुरुंगात पाठवतो.

सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास न्या. दीपक मिश्रा, न्या. रंजन गोगोई आणि न्या. ए. के. सिकरी यांच्या पीठासमोर सहारा-सेबी वादाची सुनावणी सुरू झाली. सहाराच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सलमान खुर्शीद हजर झाले.

सलमान खुर्शीद: सहारा समूहास ५०९२ कोटी रुपये  जमा करण्यासाठी काही अवधी द्यावा. पैशांची तरतूद करण्यात काही अडचणी येत आहेत. न्यूयॉर्क आणि यूकेतील हॉटेल्सची विक्री झाल्यानंतर २४ मे रोजी रकमेची तरतूद होईल. रक्कम थेट सेबीच्या खात्यात जमा होईल.   
न्या. दीपक मिश्रा: अाधीच तुम्हाला खूप अवधी दिला. पण रक्कम जमा झालेली नाही. तुम्ही विनाकारण प्रकरण ताणून धरत आहात. सहारा समूहास तर रक्कम भरावीच लागेल. सुटका हवी असेल तर  रक्कम भरा, अन्यथा तुरुंगात जा.  
 
सलमान खुर्शीद: अॅम्बी व्हॅलीचा लिलाव करू नये, असा आमचा अाग्रह आहे.  
न्या. दीपक मिश्रा: तर मग आम्ही सुब्रतो रॉयला आता तुरुंगात पाठवतो. तुम्हाला पुरेसा अवधी देऊनही रक्कम भरलेली नाही. एमजेके होल्डिंग्ज सहाराचे न्यूयॉर्कमधील ३५२४.५५ कोटींचे हॉटेल कधी विकत घेत आहे? त्यांची ७५० कोटी रुपये अनामत का भरली नाही?  
 
श्रीराम (एमजेके होल्डिंग्जचे वकील): कंपनीचे मालक प्रकाश स्वामी यांनी आता हॉटेल विकत घेण्याचा निर्णय रहित केला आहे.   
न्या. दीपक मिश्रा: न्यायालय म्हणजे तुम्हाला गंमत वाटते काय?  न्यायालयाचा वेळ घेतल्याबद्दल स्वामी यांना १० कोटींचा दंड करत आहोत.  
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, अॅम्बी व्हॅली : ४० कोटींचा व्हिला, विमानतळसुद्धा  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...