नवी दिल्ली - दोन भारतीय मच्छीमारांच्या हत्येप्रकरणी संशयित असलेल्या इटलीच्या दोन खलाशांपैकी एका खलाशाला पुन्हा भारतात परतण्याचे आदेश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. हत्येचा आरोपी मास्सीमिलीआनो लाट्टोरी खलाशाने इटलीमध्ये आणखी काही दिवस वास्तव्यास राहण्यासाठी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे.
न्यायालयाने मंगळवारी लाट्टोरी याला १६ जानेवारी २०१५ पर्यंत भारतात परतण्यास सांगितले आहे. त्याला यापूर्वीच इटलीमध्ये राहण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर त्याने पुन्हा आणखी वाढ मिळविण्यासाठी याचिका केली होती. ती न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. लाट्टोरी हा हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी इटलीमध्ये गेला होता. तसेच सॅलवोटोरी गिरोनी या आणखी एका खलाशाने ख्रिसमससाठी इटलीला जाण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयाकडून ती नाकारण्यात आली आहे.
दोन वर्षांपूर्वीची घटना
मास्सीमिलीआनो लाट्टोरी, सॅलवोटोरी गिरोनी या दोघांनी १५ फेब्रुवारी २०१२ मध्ये केरळच्या किनारपट्टीवर दोघा मच्छीमारांची हत्या केली होती.