नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता
सलमान खानला चांगलेच फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ‘तुम्हाला केवळ व्हिसा पाहिजे, म्हणून शिक्षेला स्थगिती द्यायची का?’
सलमान खान १६ वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी आहे.
जस्टिस ए मुखोपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने बुधवारी सुनावणीदरम्यान राजस्थान उच्च न्यायालयाच्या निकालावरही प्रश्न उपस्थित केले. पीठ म्हणाले, ‘उच्च न्यायालयाने गुण-दोषांचा विचार न करता सलमानच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यामुळे ब्रिटनचा व्हिसा मिळण्यातील सलमानचे अडथळे दूर झाले. हे पुराव्यांविरुद्ध आणि विरोधाभासी आहे. व्हिसा मिळवण्यासाठी शिक्षेवर स्थगिती आणली तर प्रत्येक दोषी हीच स्ट्रॅटेजी वापरेल. ’ सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ‘असे झाल्यास प्रत्येक दोषी
आपली शिक्षा स्थगित झाल्यानंतर नोकरीसाठी परदेशात अर्ज करेल. अनेक नेत्यांनाही दोषी ठरवल्यानंतर अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांच्या दोषसिद्धीला स्थगिती दिली जाईल.’ दरम्यान, या फटकारापूर्वी
सलमान खानचे वकील सिद्धार्थ लुथरा म्हणाले की, ‘उच्च न्यायालयाने शिक्षा स्थगित केली नसती तर सलमानला परदेशात जाता आले नसते.
खटल्याची पार्श्वभूमी
जोधपूरमध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान १९९८ मध्ये
सलमान खानवर काळविटाची शिकार केल्याचा आरोप झाला होता. कनिष्ठ न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र राजस्थान उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने सध्या निर्णय प्रलंबित ठेवला आहे.
‘हिट अँड रन’ खटल्यात साक्ष
सलमान खानच्या २००२ मधील ‘हिट अँड रन’ प्रकरणीही मुंबई कोर्टात बुधवारी सुनावणी झाली. अभिनेता चंकी पाडे यांचा भाऊ चिकी यांनी सत्र न्यायालयासमोर साक्ष दिली. ते म्हणाले, ‘घटनेनंतर दुस-या दिवशी सलमान खान त्यांना भेटण्यासाठी घरी आले होते. तेव्हा त्याच्या तोंडाला दारूचा गंध येत नव्हता. ’ या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू तर अन्य चौघेजण जखमी झाले होते.