नवी दिल्ली - आर्थिकदृष्ट्या फायदेशीर मार्गांवरच विमान कंपन्या हवाई सेवा चालवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर ताशेरे ओढले आहेत. हिमाचल प्रदेश, पूर्वोत्तर राज्यांमध्ये कमी फायदा असल्याने विमानसेवा सुरू केली गेली नाही. त्यामुळे सिमल्यासह पूर्वोत्तर राज्यांशी हवाई संपर्क साधणे शक्य नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने म्हटले की, जर तुम्ही एखाद्या खासगी कंपनीला चेन्नई, हैदराबाद, बंगळुरूसाठी विमान उड्डाणास परवानगी देत असा तर त्यांना हिमाचल प्रदेश,पूर्वोत्तर राज्ये, अंदमान -निकोबारसाठी सेवा सुरू करण्यास का नाही सांगू शकत नाही. हिमाचल, पूर्वोत्तर राज्यांची चिंता न करता सरकार खासगी कंपन्यांच्या आर्थिक हिताची पूर्ण चिंता करत आहे, असे यावरून लक्षात येते, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. भाजप नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी याबाबत याचिका दाखल केली होती.