आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: निर्भया हत्याकांड: चारही दोषींना फाशी कायम, सुप्रीम कोर्टात प्रथमच टाळ्या वाजवून झाले निकालाचे स्वागत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील चार दोषींची फाशी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली. या प्रकरणी चाैघांची याचिका कोर्टाने फेटाळली.
 
निकाल जाहीर करताना न्या. दीपक मिश्रा म्हणाले, ‘१६ डिसेंबर २०१२च्या रात्री निर्भयावर जो अत्याचार झाला त्यामुळे जगभरात धक्का बसला. असे वाटते की ही परग्रहावरचीच घटना आहे. अशा गुन्हेगारांना माफी किंवा दया दाखवण्याची कायद्यात तरतूदच नाही.’ या प्रकरणात एकूण ६ आरोपी होते. एकाने तुरुंगातच आत्महत्या केली. एक अल्पवयीन होता. ३ वर्षांची शिक्षा भोगल्यावर त्याची सुटका झाली. उर्वरित चौघे, मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर तिहार तुरुंगात आहेत. तीन न्यायमूर्तींपैकी न्या. दीपक मिश्रा व न्या. अशोक भूषण यांनी एकत्रित निकाल दिला. तर, न्या. आर. भानुमती यांनी सामाजिक सुधारणांचा विशेष उल्लेख करून वेगळा ११४ पानी निकाल दिला.
 
निर्भया हत्याकांड - दोषींविरुद्ध सर्वात उशिरा लागला सुप्रीम कोर्टाचा निकाल
कनिष्ठ न्यायालय : ९ महिन्यांत दिला निकाल
निर्भयाची १६ डिसेंबर २०१२ रोजी रात्री निर्घृण हत्या झाली होती. १७ दिवसांनी तिचा मृत्यू झाला. साकेत न्यायालयात सुनावणी सुरू झाली. १३ डिसेंबर २०१३ रोजी सर्वच आरोपींना फाशी ठोठावली.
 
दिल्ली हायकोर्ट: निकालास ६ महिने लागले
निकालानंतर ट्रायल कोर्टाने प्रकरण हायकोर्टाकडे सोपवले. ३ जानेवारी २०१४ रोजी निकाल राखून ठेवला. १३ मार्च २०१४ रोजी फाशीची शिक्षा कायम ठेवत असल्याचा निकाल दिला.
 
सुप्रीम कोर्ट : येथे लागले तब्बल ३८ महिने
हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध दोषींनी सुप्रीम कोर्टात अपील केले. न्यायालयाने १५ मार्च २०१४ रोजी शिक्षेला स्थगिती दिली आणि निकाल जाहीर करण्यास ३ वर्षे २ महिने लागले.
 
६ आरोपी : एकाने तुरुंगात आत्महत्या केली, १ अल्पवयीन होता. ३ वर्षे शिक्षा भोगून तो सुटला, उर्वरित ४ तुरुंगात...
 
- न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्या. अशोक भूषण
 दोन न्यायमूर्तींनी एकत्र, न्या. भानुमती यांनी वेगळा निकाल सुनावला
 
चौघांची साक्ष...ठोस पुरावा
- मृत्युपूर्व जबाब : पीडितेच्या मृत्युपूर्व जबाबावर संशय घेतला जाऊ शकत नाही. गंभीर अवस्थेत तिचा जबाब नोंदवला होता.
- न्यायवैद्यक पुरावा : पीडितेच्या शरीरातील नमुन्यांसोबत दोषींचे डीएनए प्रोफाइल जुळले आहे. शरीरावरील चावलेल्या खुणाही जुळल्या.
- गुन्हेगारी पार्श्वभूमी : दिल्ली पोलिसांच्या तपासाबाबत उपस्थित केलेल्या शंका कोर्टाने फेटाळल्या. पोलिसांनी अक्षय, मुकेश, पवन व विनय यांचा कट सिद्ध केला. या लोकांनी पीडिता व तिच्या मित्राच्या अंगावर बस घालण्याचा प्रयत्न केला होता. 
- मित्राची साक्ष : पीडितेसोबत प्रवास करणाऱ्या मित्राची साक्ष विश्वासार्ह आहे, असे कोर्ट म्हणाले.
 
कोर्टाचे पाच सल्ले
कुटुंबासाठी : मुलांना पुरुषांचा आदर करण्यास शिकवले जाते तसेच महिलांचाही आदर शिकवावा.
समाजासाठी : समाजानेही आपली मानसिकता बदलावी. लिंगभेद मिटण्यायोग्य वातावरण बनवावे. महिलांना वास्तवात लिंगभेदरहित न्याय द्यावा.
सरकारसाठी : लैंगिक समानता शालेय अभ्यासक्रमात असावी. शिक्षक व पालकांनी मुलांच्या वर्तवणुकीवर लक्ष ठेवावे.
पोलिसांसाठी : पथदिवे, रात्री गस्त, निर्जन स्थळी गार्ड नेमावेत. महिलांसाठी मोबाइल अॅप लाँच करावे.
मीडियासाठी : टीव्ही, मीडिया व प्रेसच्या माध्यमातून लोकांना लिंगभेदरहित न्यायाप्रति संवेदनशील करू शकता.
 
पुढे काय...
आता फाशीपासून बचावासाठी ३ संधी
1. फेरविचार याचिका :
या निकालाविरुद्ध दोषी फेरविचार याचिका दाखल करू शकतील. याच्या सुनावणीसाठी अधिक जज असलेले पीठ स्थापावे लागेल.
2. क्युरेटिव्ह पिटिशन : पुनर्विचार याचिका फेटाळली गेली तर क्युरेटिव्ह पिटिशनने निकालात बदल करण्याची विनंती केली जाऊ शकेल.
3. दयेची याचिका : दोन्ही याचिका फेटाळल्या गेल्यानंतर दोषी राष्ट्रपतींकडे दयेची याचिका दाखल करू शकतील. राष्ट्रपतींना वाटले तर ते या चौघांना जीवदान देऊ शकतात.
 
निर्भयाची आई म्हणाली - फासावर लटकावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
आता मुलीला म्हणेन, तुला न्याय मिळवून दिला. मात्र, चौघांना फासावर लटकावण्याची वाट पाहतेय, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. ती जिवंत असती तर १० मे राेजी २८ वर्षांची झाली असती.
- आशादेवी
 
पुढील स्लाइडवर वाचा, सुप्रीम कोर्टात प्रथमच टाळ्या वाजवून झाले निकालाचे स्वागत... देशाला हदरवणाऱ्या त्या काळरात्रीची कथा...आणि VIDEO द्वारे पाहा निर्भयाच्या बलात्काऱ्यांची कशी आहे मानसिकता....
 
हे ही वाचा, 
 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...