आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushma Swaraj Best Minister In PM Narendra Modi Government : Survey

SURVEY: मोदींच्या कामकाजावर 59% लोक समाधानी, सुषमा ‘बेस्ट मिनिस्टर’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एका देशव्यापी सर्वेक्षणात समोर आलेल्या तथ्यांनुसार परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे कामकाज एनडीए सरकारमध्ये सर्वात चांगले राहिले आहे. इंडिया टिव्ही आणइ सी-वोटर यांनी केलेल्या या सर्वेक्षणात 59 टक्के लोकांनी मोदींच्या कामावर समाधानी असल्याचे म्हटले आहे, तर 41 टक्के लोकांनी मात्र मोदी सरकारच्या कामावर समाधानी नसल्याचे म्हटले आहे.

सुषमा नंबर एक, राजनाथ नंबर दोन
या सर्वेक्षणात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना कामाच्या आधारावर सर्वात उत्कृष्ट मंत्री असल्याचा कौल मिळाला आहे. स्वराज यांच्या कामाला 56 टक्के लोकांनी चांगले असल्याची पावती दिली आहे. तर 31 टक्के लोकांनी सरासरी आणि केवळ 13 टक्के लोकांनी त्यांचे काम खराब असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर क्रमांक लागतो तो गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा. त्यांचे काम चांगले असल्याचे 50 टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर 36 टक्के लोक सरासरी आणि 14 टक्के लोकांनी त्यांचे काम खराब असल्याचे म्हटले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांचे काम चांगले असल्याचे 48 टक्के लोकांनी सांगितले आहे. तर 28 टक्के लोकांनी त्यांचे कामकाज सरासरी आणि 23 टक्के लोकांनी त्यांचे काम खराब असल्याचे म्हटले आहे. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईरानी यांचे कामकाज 44 टक्के लोकांना चांगले वाटले आहे. गडकरींची टक्केवारी तर यापेक्षाही कमी आहे. केवळ 40 टक्के लोकांनी त्यांचे काम चांगले असल्याचे म्हटले आहे.

सरकारसाठी संकेत
याच सर्वेक्षणात 78 टक्के लकांनी मोदी सरकारने भू संपादन विधेयक परत घ्यावे असे म्हटले आहे. सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी झाली आहे, असे मतही लोकांनी व्यक्त केले आहे. तर 63 टक्के लोकांनी गरीब आणि शेतकऱ्यांचे विरोधक अशी मोदी सरकारची प्रतिमा बनल्याचे म्हटले आहे. या सर्वेक्षणात 48 टक्के लोकांनी गेल्या एक वर्षात नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी झाल्याचेही म्हटले आहे.

मोदींना झटका
सर्वेक्षणात प्रादेशिक आधारावरही लोकांची मते जाणून घेण्यात आली. त्यात उत्तर भारतात 65, पश्चिम भारतात 52, पूर्व भारतात 34 आणि दक्षिण भारतात 38 टक्के लोकांनी मोदींची लोकप्रियता गेल्या वर्षभरात घटल्याचे म्हटले आहे.

स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा
मोदी सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या योजनांबाबत विचारणा केली असता 46 टक्के लोकांनी स्वच्छ भारत अभियानाला पसंती दिली आहे. 19 टक्के नागरिकांनी जन-धन योजना, 18 टक्के लोकांनी मेक इन इंडिया आणि 11 टक्के नागरिकांनी आदर्श ग्राम योजनेला पाठिंबा दर्शवला आहे.