आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित गेटप्रकरणी निवेदन; मदत करणे गुन्हा असेल तर तो मी केला : सुषमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मनी लाँडरिंगचे आरोपी आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्याच्या प्रकरणात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी मौन सोडत लोकसभेत स्पष्टीकरण दिले.

सुषमा म्हणाल्या, ललित मोदींना प्रवास परवानगीची कागदपत्रे देण्यास मी शिफारस केली नाही. ब्रिटिश सरकारला केवळ तोंडी निरोप देत निर्णय त्यांच्यावरच सोडला. अशी मदत करणे गुन्हा असेल तर होय, मी गुन्हा केलाय. त्यासाठी सभागृह देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे. पुढे त्या म्हणाल्या, मोदींची पत्नी १७ वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त आहे. दहाव्यांदा त्यांचा कर्करोग उमळून आला आहे. पोर्तुगालमध्ये त्यांच्यावर उपचार करायचे होते. प्रसंगी त्यांचा मृत्यूही झाला असता. माझ्या ठिकाणी तुम्हीही असत्या तर काय केले असत, असा सवाल त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना केला.

माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी एखादा कागद, मेल दाखवावा. मी कसे केले? का केले? विचारले जात आहे. पण मी काय केले हे तर सांगा? मी मोदींना लाभ मिळवून दिला का? त्यांना देशाबाहेर पळवले का? त्यांच्याविरुद्धची चौकशी थांबवली की कागदपत्रे दिली ?
- सुषमा स्वराज, परराष्ट्र मंत्री

भावनिकतेने बगल देण्याचा खटाटोप : काँग्रेस
स्वराज यांच्या निवेदनावर काँग्रेसने पलटवार केला. सुषमांनी संसदेत जे काही सांगितले ते निरर्थक आहे. या प्रकरणाला भावनिक रंग देऊन बगल देण्याचा खटाटोप त्यांनी केला. सुषमांनी मंत्री झाल्यानंतर अशा किती प्रकरणात निर्णय घेतले? त्यांच्याकडे किती याचना आल्या होत्या? ललित मोदींना जर मानवतेच्या दृष्टिकोनातूनच मदत केली होती तर ४८ तासांच्या आतच ते जगभर कसे काय फिरू लागले?, असे सवाल काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केले आहेत.