आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushma Swaraj Had Offered Her Resignation After Lalit Modi Controversies

सुषमा यांच्या भेटीनंतर जेटली म्हणाले, \'परराष्ट्र मंत्र्यांनी काहीच चूक केले नाही\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएलमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोपी ललित मोदींना मदत केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या बचावासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जटली सरसावले आहेत. मोदीगेटमध्ये जेटलींनी सुषमा स्वराज यांना क्लिनचिट देत सरकार आणि पक्ष त्यांच्या सोबत असल्याचे म्हटले आहे. जेटली म्हणाले, 'त्यांनी जे केले ते योग्यच होते.'

जेटली आणि गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषदेत स्वराज यांची पाठराखण केली आहे.

'मंत्री स्वतः निर्णय घेतात, जबाबदारी सामुहिक'
जेटली म्हणाले, आमच्या सरकारमध्ये मंत्री स्वतः निर्णय घेतात आणि त्याची जबाबदारी सामुहिक असते. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, पक्षातील उशा खालचा साप कोण आहे, तेव्हा त्यांनी पुढचा प्रश्न काय असे म्हणत उत्तर देण्याचे टाळले.

पत्रकार परिषदेआधी घेतली सुषमा स्वराज यांची भेट
अर्थमंत्री जेटलींनी पत्रकार परिषदेआधी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतल्याची दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या दालनात स्वराज यांनी त्यांची भेट घेतली, यावेळी जेटलीही तिथे उपस्थित होते.

काँग्रेसची चौकशीची मागणी
माजी आयपीएल आयुक्त आणि भ्रष्टाचाराचे आरोपी ललित मोदी यांची परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केल्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मंगळवारी पक्षाचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले, 'देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एका फरार व्यक्तीची मदत का केली, याची कसून चौकशी झाली पाहिजे. मोदी सरकारवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एसआयटी नेमुन या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे.'

पोर्तुगालमध्ये कोणतीही शस्त्रक्रिया नव्हती - काँग्रेस
काँग्रेसने पोर्तुगालमध्ये ललित मोदीच्या पत्नीवर शस्त्रक्रिया केली जाणार होती, ही खोटी माहिती असल्याचे म्हटले आहे. ललित मोदींना ट्रॅव्हल डॉक्युमेंटसाठी सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना म्हटले होते, की ललित मोदीच्या पत्नीला कँसर आहे आणि तिच्यावर पोर्तुगालमध्ये शस्त्रक्रिया होणार होती. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने कागदपत्र मिळण्यासाठी मदत केली होती. त्यांच्या माणुसकीच्या नात्याने मदत केल्याचा दावा काँग्रेसने खोटा असल्याचे म्हटले आहे. पोर्तुगालमध्ये कोणतीही शस्त्रक्रिया होणार नव्हती.
काँग्रेसचे मोदींना 5 प्रश्न :
1) ज्याच्यावर 700 कोटी रुपयांचे मनी लाँडरिंग केल्याचा आरोप आहे अशा पळपुट्याला प्रवासाचे दस्तऐवज देण्यासाठी परराष्ट्रमंत्र्यांनी मदत का केली?
2) पंतप्रधानांच्या सहमतीनेच ही मदत करण्यात आली आहे का? असे असेल तर पंतप्रधानांनी असे का केले? मोदींना (ललित) मोदीच (नरेंद्र) मदत करत होते काय?
3) भाजपचे सरकार आण पक्षातील कोणते लोक ललित मोदींना मदत करत होते? एकीकडे अंमलबजावणी संचालनालय मोदींची चौकशी करत आहे आणि दुसरीकडे परराष्ट्रमंत्री त्यांना मदत करत आहेत, ही काय भानगड आहे?
4) काळा पैसा परत आणूच, या पंतप्रधान मोदींच्या दाव्याचे काय होणार? पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त सरकारचा दावाही केला होता, त्याचे काय होणार?
5) स्वराज यांनी जे केले ते योग्यच केले, असे भाजप अध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने मानवतेच्या दृष्टिकोनातून देशातील पळपुट्यांना भविष्यात मदत करण्याचे धोरण स्वीकारले आहे काय?