नवी दिल्ली - २००३ मध्ये चुकून पाकिस्तानमध्ये पोहोचलेली मूकबधिर गीता लवकरच भारतात
आपल्या घरी परतेल. गेल्या काही दिवसांपासून पंजाब, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील चार कुटुंबांकडून गीता आपली मुलगी असल्याचा दावा करण्यात आला होता. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या दाव्यांची शहानिशा करण्याची सूचना संबंधित राज्यांना केली आहे.
सुषमा यांनी शनिवारी सलग ट्विट करून गीताच्या प्रकरणावर केंद्र सरकारच्या तयारीची माहिती दिली. भारतीय उच्चायुक्तांना गीताने हातवारे करून त्रोटक स्वरूपाची माहिती दिली आहे. तिला सात भाऊ-बहिणी आहेत. ती आपल्या वडिलांसमवेत मंदिरात गेली होती. त्यानंतर तिने वैष्णोदेव, असे नावही लिहिले. आम्ही गीताला मायदेशी आणण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामात व्यग्र आहोत, असे सुषमा यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्ते युसरा अस्कारी यांच्या ट्विटलादेखील त्यांनी रिट्विट केले. त्यात दोन फोटो आहेत. एकामध्ये गीताने भाऊ-बहिणींची नावे लिहिली आहेत. दुसऱ्या फोटोत गीताने आपल्या घराचे चित्र तयार केले आहे. २००३ मध्ये गीता ११ वर्षांची होती.