नवी दिल्ली - पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी वाल्मीकी वस्तीमध्ये हाती झाडू घेऊन कचरा काढत "स्वच्छ भारत’ या राष्ट्रव्यापी अभियानाचा शुभारंभ केला. देशभरात मुख्यमंत्री, आमदार-खासदार, विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींसह लाखो लोक या महत्त्वाकांक्षी अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
राजपथवर मुख्य समारंभात मोदी म्हणाले, हे अभियान राजकीय नव्हे देशभक्तीने प्रेरित आहे. नागरिकांना त्यांनी ‘स्वच्छ भारतासाठी मी कचरा होऊ देणार नाही आणि कुणाला तो टाकू देणार नाही’ अशी शपथ दिली.
मोदी म्हणाले, "आतापर्यंत सर्वच सरकारनी देशात स्वच्छतेसाठी आटोकाट प्रयत्न केले. मी खरेच सांगतो, या अभियानाला
आपण जर राजकीय स्वरूप दिले तर न्यायोचित होणार नाही. हा मुद्दा राजकीय होऊ देऊ नका.' तत्पूर्वी मोदींनी राजघाटावर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीवर आदरांजली अर्पण केली. वाल्मिकी नगरात झाडू मारून अभियान सुरू केले. कचराही उचलला. नंतर राजपथवर त्यांनी जनतेला स्वच्छतेची शपथ दिली.
आइस बकेटच्या धर्तीवर स्वच्छतेचे चॅलेंज
सोशल मीडियावरही एएलएस आइस बकेट चॅलेंजच्या धर्तीवर स्वच्छ भारत चॅलेंज मोदींनी सुरू केले. सचिन तेंडुलकर, काँग्रेस नेते शशी थरूर, अनिल अंबानी,
सलमान खान, प्रियंका चोप्रा, कमल हसन, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, रामदेवबाबा आणि दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध "तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेच्या टीमला हे चॅलेंज आहे. या सर्वांनी ९ जणांना आव्हान देऊन ही साखळी वाढवायची असून हे आव्हान सर्वांनी स्वीकारले आहे.
केजरीवालही सहभागी
आम आदमी पार्टीचे संयोजक
अरविंद केजरीवाल यांनीही स्वच्छ भारत अिभयानात सहभाग घेतला. पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानाजवळ त्यांनी हे अभियान सुरू केले. पक्षाच्या आमदारांसोबत ते बीआर कॅम्प भागातही गेले. एक नाला त्यांनी स्वच्छ केला. हे केवळ प्रातिनिधिक काम राहू नये.
ग्रामपंचायतींना वर्षाला २० लाख
देशातील सुमारे २ लाख ४७ हजार ग्रामपंचायतींना या अभियानाअंतर्गत पाच वर्षे प्रत्येकी २० लाख रुपये दिले जातील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. यातून ११.११ कोटी स्वच्छतागृह बांधले जातील. यावर एकूण ३४ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.
२०१९ पर्यंत राबवणार'
हे अभियान २ ऑक्टोबर २०१४ पासून पाच वर्षे राबवले जाईल. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने "निर्मल भारत अभियानाचे' स्वच्छ भारत अभियानात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. या अभियानावर पाच वर्षांत ६५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील.
पुढे पाहा या मोहिमेची काही क्षणचित्रे...