नवी दिल्ली - अभिनेता
आमिर खान आज (गुरुवार) पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी
'स्वच्छ भारत' अभियानात सहभागी झाला. मोदींनी सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्याआधी केंद्रीय शहरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आमिर खानला मंचावर बोलावून घेतले. त्याने या अभियानात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, आठ वर्षांपू्र्वी आमिर आणि मोदी यांच्यामध्ये मोठी दरी होती. गुजरात दंगल आणि नर्मदा बचाव अभियान यावरुन आमिरने मोदींच्या गुजरात सरकारवर चांगलीच टीका केली होती. त्यानंतर गुजरातमध्ये आमिरच्या 'फना' चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.
मात्र आठ वर्षांमध्ये आमिरचा मोदींबद्दलचा दृष्टीकोण बदलल्याचे दिसत आहे. आठ वर्षांपूर्वी त्याने नर्मदा सरोवराच्या उंचीवरुन गुजरात सरकारवर कडाडून टीका केली होती. तेव्हा मोदी मुख्यमंत्री होते. त्यासोबतच गुजरात दंगलीवरुन त्याने प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले होते.
गुजरात दंगलीवर तो म्हणाला होता, 'हे दुर्दैवी आहे, की लोकांचा जीव जात होता आणि प्रशासन परिस्थिती नियंत्रित ठेवू शकली नाही.' गुजरातमध्ये नर्मदा बचाओ आंदोलनाला आमिरने पाठिंबा दिला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला होता, मात्र तो त्यांच्या भूमिकेवरून हटला नव्हता. त्याच काळात त्याच्या फना या चित्रपटावर गुजरात सरकारने प्रदर्शनास बंदी घातली होती.
मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मात्र आमिरच्या भूमिकेत बदल झालेला पाहायला मिळाला. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ ग्रहण केल्यानंतर काही दिवसांमध्ये आमिरने त्यांची पीएमओमध्ये जाऊन भेट घेतली होती. त्याने त्याचा शो सत्यमेव जयते ची डीव्हीडी मोदींना भेट दिली होती. मोदींनी मला सामाजिक समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्याचे त्याने सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच आमिर म्हणाला होता, की मोदी चांगले काम करत आहेत. ते देशाला पुढे घेऊन जातील. आमिरचे हे नवीन रुप अनेकांना अचंबीत करणार आहे.