नवी दिल्ली- दिल्ली महिला आयोग अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेल्या स्वाती मालिवाल यांच्या नियुक्तीची फाइल केजरीवाल सरकारने गुरुवारी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे पाठवली. या नियुक्तीसाठी
आपली परवानगीच घेतली नाही म्हणून जंग यांनी नियुक्ती रद्दबातल ठरवली होती.
उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी ही माहिती दिली. शिसोदिया म्हणाले, दिल्लीत झालेल्या मानहानीकारक पराभवाचा वचपा काढण्यासाठी केंद्र सरकार टपले आहे. म्हणूनच भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचाही शक्तिपात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिल्लीतील पराभव मोदी सरकार पचवू शकलेले नाही. मात्र, कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत भ्रष्टाचाराचे गुजरातम मॉडेल लागू करू दिले जाणार नाही, असा इशारा सिसोदिया यांनी दिला.
मालिवाल यांच्या नियुक्तीबाबत केवळ एका स्वाक्षरीचा मुद्दा एवढा गंभीर पातळीवर नेऊन ठेवण्यात आला असल्याचे शिसोदिया म्हणाले. मालिवाल यांची नेम प्लेट पण काढून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी मालिवाल यांनीही आपल्या कार्यालयाला कुलूप घालण्यात आले असल्याचा दावा केला. काही वेळानंतर हे कुलूप उघडले गेले, मात्र नेम प्लेट काढून घेण्यात आल्याचे मालिवाल म्हणाल्या.
आप नेते गृहमंत्र्यांना भेटले
आप नेते दिलीप पांडे यांना दिल्ली पोलिसांच्या एका वाहनाने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षाचे काही नेते गृहमंत्री राजनाथसिंह यांना भेटले. नेमके जे घडले त्याचे व्हिडिओ चित्रण या नेत्यांनी गृहमंत्र्यांकडे सोपवले. या वेळी आपचे नेते कुमार विश्वास, संजय सिंह यांचीही उपस्थिती होती. दिल्लीतील कायदा-सुव्यवस्थेबाबतही या नेत्यांनी राजनाथ यांच्याशी चर्चा केली.
पांडे यांचा आरोप
आप नेते दिलीप पांडे यांनी केलेल्या आरोपानुसार, पोलिसांनी पांडे यांना त्यांच्या वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला होता. यावर खुलासा करताना या वाहनाच्या चालकाने मात्र ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले आहे. यात पांडे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
तोमर यांना जामीन
बनावट पदवी प्रकरणी अटकेत असलेले आप नेते व दिल्लीचे माजी कायदा मंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना सत्र न्यायालयाने गुरुवारी सशर्त जामीन मंजूर केला. कोर्टाच्या परवानगीशिवाय तोमर यांनी दिल्ली सोडून जाऊ नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.