बर्न/नवी दिल्ली - भारतीय कर अधिकाऱ्यांकडून अनेक नागरिकांच्या स्विस बँक खात्यांची चौकशी होत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या माजी मंत्री प्रणीत कौर आणि त्यांचे पुत्र रणिंदर सिंह यांच्या कथित स्विस बँक खात्यांची चौकशी करण्यासाठी भारताने मदत मागितली असल्याची माहिती स्वित्झर्लंडने दिली आहे. अशा प्रकारच्या मदतीत खातेधारकाचे खाते व इतर माहिती देण्याचा समावेश असू शकतो.
स्वित्झर्लंडच्या कर विभागाने (एफटीए) आपल्या नियमांतील दुसरी बाजू एेकून घेण्याच्या तरतुदीनुसार कौर आणि रणिंदरला १० दिवसांत याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. एफटीएने गॅझेटमध्ये प्रकाशित दोन अधिसूचनांत हा खुलासा केला. त्यात नागरिकत्व आणि जन्मतारखे व्यतिरिक्त दोघांबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे, या प्रकरणात कौर माता-पुत्राने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
याआधी कौर यांचे नावे एचएसबीसीच्या फुटलेल्या यादीत समोर आले होते तेव्हा त्यांनी कोणत्याही परदेशी बँकेत आपले खाते असल्याच्या इन्कार केला होता. स्वित्झर्लंड आणि भारत सरकारमध्ये करविषयक करार झाल्यानंतर स्वीस बँकेत खाते असणाऱ्या भारतीय नागरिाकंची माहिती काही महिन्यांपूर्वी भारताला पुरवण्यात आली होती. आजवर अनेक लोकांच्या खात्यांची माहिती भारताकडे सोपवण्यात आली आहे.