आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Switzerland Not Sharing Information On Bank Accounts Of Indians: P Chidambaram

स्वित्झर्लंड ‘ब्लॅकमनी’ची माहिती देत नाही : चिदंबरम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीयांनी स्वित्झर्लंडमध्ये दडवून ठेवलेल्या काळ्या पैशाबाबतची माहिती तेथील सरकार देत नसल्याबद्दल अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कडक शब्दांत पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. स्वित्झर्लंडने सहकार्य न केल्यास हा मुद्दा जी-20 च्या मंचावर उपस्थित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

चिदंबरम यांनी स्वित्झर्लंडचे अर्थमंत्री विदमेर स्कलुम्फ यांना दोन पानी पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी जी-20 ने 1 एप्रिल 2009 रोजी जारी केलेल्या घोषणापत्राचा उल्लेख केला. यामध्ये बॅँकेतील गोपनीयतेचा जमाना संपुष्टात आल्याचा उल्लेख करण्यात आला होता.

स्वित्झर्लंडने असहकार्याचे धोरण सुरूच ठेवल्यास त्या देशाला असहकार्य करणार्‍या देशांच्या कक्षेत आणण्याबाबत गांभीर्याने विचार केला जाईल, असा इशारा चिदंबरम यांनी दिला आहे. स्वित्झर्लंड उभय देशांतील दुहेरी कर सहकार्य कराराचा (डीटीएए) सन्मान करत नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. या कराराअंतर्गत प्राप्तिकर कार्यालयाला भारतीयांचे स्विस बॅँकेतील अकाउंट पाहण्याचा अधिकार आहे. स्वित्झर्लंडच्या म्हणण्यानुसार, विनंती चोरीच्या माहितीवर आधारित आहे. याचा अर्थ स्वित्झर्लंड अद्यापही बॅँक गोपनीयतेत विश्वास ठेवते. त्यामुळे त्यांची भूमिका सध्याच्या काळानुरूप नाही, असे चिदंबरम यांनी 13 मार्च रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सार्वजनिक वित्त आणि आर्थिक प्रणालीचे रक्षण करण्यासाठी जी-20 च्या भूमिकेचा दाखला देत चिदंबरम म्हणाले, डीटीएसीअंतर्गत स्वित्झर्लंडने माहितीस नकार दिला.