आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ताज’समोर सापडला आणखी एक महाल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - सात जागतिक आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालजवळ भारतीय पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननात एका नव्या वास्तूचा शोध लागला असून हा बादशहा शाहजहानचा उन्हाळी महाल असल्याचे मानले जात आहे.

ताजमहालासमोरील जागेत मेहतब बाग हे मुघल काळातील उद्यान आहे. त्या ठिकाणी पुरातत्त्व विभागाला या महालाचे अवशेष सापडले. उन्हाळ्यामध्ये मोकळी हवा येण्याच्या दृष्टीने या बारादरी महालाची रचना करण्यात आली होती. येथील उद्यान म्हणजे शाहजहानचे आवडते ठिकाण होते. ताजमहालाचे रात्रीचे दृश्य पाहण्यासाठी महालाकडे येत असे. त्यामुळे या महालाचे नाव ‘मेहतब’ (चंद्राचा प्रकाश) असे ठेवण्यात आले. बारादरीसारखी रचना असलेल्या बांधकामाचे अवशेष ताजमहालाच्या समोर सापडले आहेत. मुघल बादशहानेच (शाहजहान) नदीकिनारी बसून ताजमहालाचे दृश्य पाहण्यासाठी हा महाल बांधला असावा असे वाटते. पूर किंवा या बांधकामाखालील पोकळीमुळे ते खचले असावे, असे पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)