नवी दिल्ली - आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नई सुपरकिंग्ज आणि त्याचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन यांच्याविरुद्ध लवकर कारवाई होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बीसीसीआयला याबाबत आदेश दिले.
न्यायालय म्हणाले, मंडळाच्या कामकाजातून बाजूला केलेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी या प्रक्रियेपासून लांब राहावे. प्रकरणाची सुनावणी बुधवारीही सुरूच राहील. न्या. टी.एस. ठाकूर आणि न्या.एफ.एम.आय. कलिफुल्ला यांच्या पीठाने या खटल्याची सलग दोन दिवस सुनावणी केली. "आम्हाला मयप्पनविरुद्ध कारवाई हवी आहे. शिक्षेचा निर्णय कसा घ्यावयाचा आणि त्यासाठीचा अवधी काय असावा ते मंडळ ठरवेल. मात्र, यामध्ये श्रीनिवासन यांचा हस्तक्षेप नसावा. कारण मयप्पनविरोधात कारवाई न करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे,' असे न्यायालयाने नमूद केले.
श्रीनिवासन, मयप्पनचे सासरे आणि चेन्नई सुपरकिंग्ज टीमचे मालकही आहेत. आम्ही बीसीसीआयच्या कामकाजात हस्तक्षेप करू इच्छित नाही. शिक्षा ठरवण्यासाठी मंडळाला चार पर्याय दिले असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाचे चार पर्याय
१. श्रीनिवासन मंडळापासून बाजूला व्हावेत आणि मयप्पनविरुद्ध कारवाई होऊ द्यावी.
२. दोन न्यायाधीशांची स्वायत्त समिती बनवून मयप्पनची शिक्षा ठरवावी.
३. आयपीएल प्रशासकीय समितीने मयप्पनच्या शिक्षेचा निकाल द्यावा.
४. न्या. मुकुल मुद्गल समितीनेच मयप्पनच्या शिक्षेचा निकाल द्यावा.
यामुळे कारवाई
१. मुद्गल समितीने मयप्पनला सट्टेबाजीत दोषी ठरवले आहे. ते केवळ सट्टा लावत नव्हते, तर चेन्नई सुपरकिंग्ज टीमची माहिती सट्टेबाजांना देत होते.
२. मयप्पन चेन्नई सुपरकिंग्जचे अधिकारी होते. नियमांनुसार एखाद्या संघाचा मालक/अधिकारी सट्टेबाजी किंवा फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यास संघाची मान्यता रद्द होऊ शकेल.
...तर काय क्रिकेटपटूंची निर्मिती ब्रह्माची
लोकसभेतही क्रिकेटचा मुद्दा गाजला. भाजप खासदार वीरेंद्र सिंह यांनी ग्रामीण भागातील खेळाच्या दुरवस्थेबाबत प्रश्न विचारला. ते म्हणाले, असे वाटते क्रिकेटपटूंना ब्रह्मदेवाने बनवले आहे. अन्य खेळाडूंना ब्रह्मदेवाच्या सेवकांनी बनवले असेल. त्यामुळेच क्रिकेटपटूंना सुविधा मिळतात, बाकीच्यांना नाही.