आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईव्हीएममधील छेडछाड प्रकरण; केंद्र, निवडणूक आयोगाला नोटीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी (ईव्हीएम) छेडछाड करण्याची शक्यता असल्याच्या  वादाचे पडसाद आता सर्वोच्च न्यायालयात पडले आहेत. पेपर ट्रेलशिवाय ही यंत्रे फुलप्रूफ नाहीत, या आरोपाची चौकशी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.  

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाने यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणावर छेडछाड केल्याचा दावा बसपने याचिकेत केला आहे. न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांनी यासंदर्भात केंद्र सरकार आणि भारताच्या निवडणूक आयोगाला नोटिसा जारी केल्या आहेत. 

‘कुठल्याही तंत्रज्ञानाशी छेडछाड करता येऊ शकते, हे आम्ही तांत्रिकदृष्ट्या मान्य करतो, पण तुम्हाला संशय व्यक्त करण्यासाठी पुरेसा आधार हवा. मतदान केंद्र बळकावणे आणि इतर गैरप्रकार थांबवण्यासाठी  ईव्हीएम यंत्रांचा वापर प्रचलित झाला. हे काम प्रगतिपथावर आहे,’ असे न्यायालयाने बसपची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ पी. चिदंबरम यांना सांगितले. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आता ८ मे रोजी ठेवली आहे. ईव्हीएम हॅक करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी छेडछाड होते हे दाखवा, असे ‘खुले आव्हान’च निवडणूक आयोगाने बुधवारी राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांना दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आली.  

आपली बाजू मांडताना चिदंबरम म्हणाले की, ईव्हीएम फुलप्रूफ नाहीत, असे निवडणूक आयोगानेच म्हटले आहे. आयोगाला व्हीव्हीपॅट हवे आहे. त्यांनी सरकारकडे व्हीव्हीपॅट पुरवण्यासाठी सरकारकडे पैशाची मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांनी पंतप्रधानांनाच पत्रे लिहिली आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाने ईव्हीएमच्या वापराविरोधात मत नोंदवलेले आहे, असा दावा चिदंबरम यांनी केला.  

काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद...
ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल म्हणाले की, कुठलेही तंत्रज्ञान हॅक केले जाऊ शकते. हे गंभीर चिंतेचे कारण आहे. काँग्रेसही या वादात हस्तक्षेप करेल. ‘ईव्हीएममध्ये काहीही समस्या नाही,’ असे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी बुधवारीच ठामपणे सांगितले होते. त्यामुळे सिब्बल यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे. सिब्बल यांचे सहकारी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली यांनीही, ‘पुन्हा मतपत्रिकांचा वापर करणे हे प्रतिगामी पाऊल ठरेल,’ अशी टिप्पणी केली होती.
 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...