आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tapas Pal Issues Apology For His Rape Remark, Mamata Attacks Media

तापस पालांचे ‘रेप’च्या धमकीने हाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता/नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेसचे खासदार तापस पाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राजकारण तापले आहे. भाजपने त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. माकप नेते सीताराम येचुरी यांनी आपला पक्ष संसदेत तापसविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे म्हटले आहे.

प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून तापस यांनी या वक्त्व्याबद्दल माफी मागितली. त्या आधी त्यांच्या पत्नी नंदिनी पाल यांनीही माफी मागितली होती. तृणमूल काँग्रेसचे कृष्णानगरचे खासदार तापस पाल यांनी माकप कार्यकर्त्यांना हत्या आणि अत्याचार करण्याची धमकी दिली होती. या वक्तव्यावर त्यांच्या पत्नी नंदिनी म्हणाल्या, मी त्यांच्या वक्तव्यासाठी माफी मागते. या वक्तव्याचे सर्मथन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, ज्यांनी त्यांना असे बोलण्यास भाग पाडले ती बाजूही मी जाणते. त्यांना असे का म्हणावे लागले, हा भाग वेगळा आहे. तरीही मी त्यांच्या वतीने माफी मागते. यासंदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते मुकुल रॉय म्हणाले, पक्षाने तापस यांना विनाशर्त माफी मागण्यास सांगितले आहे. त्याआधी पक्षाने सोमवारी त्यांना 48 तासांच्या आत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. माकपने लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे म्हटले आहे.

असे बरळले तापस पाल
तृणमूल काँग्रेसचे खासदार तापस पाल नदिया जिल्ह्यातील चौमाहा गावात केलेल्या भाषणात म्हणाले, माकपच्या लोकांनी माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकावे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्यास मी तुमच्या कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडीन. आमच्या आयाबहिणींचा अवमान केल्यास आमचे कार्यकर्ते तुमच्या घरी पाठवू. ते तुमच्या महिलांवर अत्याचार करतील. या वक्तव्याशी संबंधित व्हिडिओ स्थानिक भाषेतील वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आला होता. यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर पोहोचले. तापस यांनी आपण रेप (अत्याचार) नव्हे, तर कार्यकर्त्यांना रेड (धाड) मारण्यास सांगितले होते, अशी सारवासारव केली आहे.

ममता बॅनर्जी गप्प का : माकप
हे गंभीर प्रकरण आहे. तापस यांच्या वक्तव्याविरुद्ध आमचा पक्ष संसदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करेल. तापस यांच्या घाणेरड्या विधानावरून त्यांच्याविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करावी. या प्रकरणात ममता बॅनर्जी गप्प का आहेत, हे समजत नाही, असे माकपचे खासदार सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे.

- यापेक्षा जास्त लाजिरवाणे वक्तव्य होऊ शकत नाही. मला वाटते, त्यांना तत्काळ निलंबित करून चौकशी केली जावी. याप्रकरणी अद्याप त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल होऊ शकला नाही, याचे दु:ख वाटते. - ममता शर्मा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष

- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिले आहे. तुम्ही एक स्वत: महिला आहात. तापस यांच्या वक्तव्यामुळे तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागला असेल. पाल यांना तुरुंगात पाठवले पाहिजे. - लक्ष्मीकांता चावला, राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजप

(फोटो - संग्रहित छायाचित्र)