आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात दररोज १०० किमी महामार्ग निर्मितीचे लक्ष्य- गडकरी यांचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकार देशात महामार्गांचे जाळे तयार करण्यास कटिबद्ध असून दररोज १०० किलोमीटरचा महामार्ग बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असल्याचा दावा रस्ते वाहतूक, महामार्ग आणि शिपिंग मंत्री नितीन गडकरी यांनी केला. पीएचडी चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या ११० व्या वार्षिक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सरकारच्या वतीने दररोज ३० किलोमीटर महामार्ग बनवण्याचे उद्दिष्ट असले तरी याच्याही पुढे जात दररोज १०० किलोमीटर महामार्ग तयार करण्याचे उद्दिष्ट आम्ही समोर ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.

शिपिंग आणि महामार्गांच्या माध्यमातून देशातील जीडीपीमध्ये दोन टक्क्यांचे योगदान देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्गाची लांबी ९०,००० किमीवरून १.५ लाख किमी करण्याचे उद्दिष्ट सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. महामार्गावर १२०० अॅमिनिटी सेंटर उभारण्याची सरकारी योजना आहे. दिल्ली ते मेरठदरम्यानच्या महामार्गाचे काम एका महिन्यात सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील काळात सुरू होणाऱ्या योजनांमुळे राजधानी दिल्लीतील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. सिमेंट कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या गटबाजीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगत, गरज पडल्यास चीनमधून सिमेंट आयात करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
जलमार्गांमुळे कोळसा वाहतूक खर्चात मोठी बचत
देशात जलमार्गांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात त्यांनी सकारात्मक उल्लेख केला. भारतात प्रस्तावित असलेल्या जलमार्गांमुळे नागरिकांबरोबरच सामानाची वाहतूक करणे सोपे होणार असल्याचे ते म्हणाले. यामुळे कोळसा वाहतुकीवर होणाऱ्या खर्चात वार्षिक १०,००० कोटी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे. यासाठी नद्यांमध्ये १११ जलमार्ग बनवण्याची सरकारची योजना आहे. या योजनेला याच वर्षी संसदेत मंजुरी मिळण्याची अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली. यामुळे पैशाची बचत होण्यास मदत मिळेल. पर्यावरणपूरक वाहतुकीचे अनेक पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारताचा विकासदर लवकरच दोनअंकी : सिंह
विदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक असून यामुळे देशाच्या विकासदरात वाढ होण्याची आशा आहे. लवकरच भारताचा विकासदर दोनअंकी होण्याची अपेक्षा असल्याचे मत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे. वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात भारताने आठ टक्के विकासदरापर्यंत मजल मारली होती. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचाही आपल्यावर जास्त परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.