नवी दिल्ली - टेट्रा ट्रक खरेदी प्रकरणात निवृत्त लेफ्टनंट जनरल तेजिंदर सिंह यांना सोमवारी अटक करण्यात आली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. भारतीय लष्कराच्या अवजड वाहतुकीसाठी १,६७६ टेट्रा ट्रक खरेदी करण्यात येणार होते. या खरेदीसाठीची कागदपत्रे संमत करण्यासाठी तेजिंदर यांनी २०१० मध्ये तत्कालीन सेनाप्रमुख जनरल व्ही.के सिंह यांना लाच देऊ केली होती. हा प्रकार व्ही. के.सिंह यांनी उघड केला. या प्रकरणाची माहिती
आपण तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांना दिल्याचेही व्ही. के. सिंह यांनी सांगितले आहे. त्यानंतर याची लेखी तक्रार सीबीआयकडे दिल्याचेही व्ही. के. म्हणाले. सध्या विशेष सीबीआय जज मधू जैन यांनी तेजिंदर यांना २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी २० ऑक्टोबरला होणार आहे. सीबीआयद्वारे दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची २८ ऑगस्ट रोजी न्यायालयाने दखल घेतली होती.