आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या ‘तेजस’ची प्रथमच परदेशी आकाशात भरारी, बहारिनचा आंतरराष्ट्रीय एअर शो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस या हलक्या लढाऊ विमानाची ख्याती आता जगभर पसरत चालली आहे. या पार्श्वभूमीवर हे तेजस विमान प्रथमच आंतराष्ट्रीय एअर शोमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहे. २१ जानेवारी रोजी बहारिन येथे साखिर हवाई तळावर हा एअर शो आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने तेजस विमान प्रथमच परदेशी भूमीवर उतरले आहे.

या एअर शोमध्ये तेजस विमान आपली कौशल्ये व शक्ती दाखवून देईल. बहारिनमध्ये आयोजित हा एअर शो २३ जानेवारीपर्यंत चालणार असून या निमित्ताने भारतीय बनावटीच्या या वजनाने हलक्या पण शक्तिशाली लढाऊ विमानाची जगाला ओळख होणार आहे. या लढाऊ विमानाची खास वैशिष्टे या शोमध्ये प्रमुख आकर्षण ठरतील. हिंदुस्थान एरॉनॉटिकल लिमिटेडचे तेजस हे एक आसनी लढाऊ विमान असून यात जेट इंजिनचा वापर करण्यात आला आहे. पूर्वी हलके लढाऊ विमान एवढीच ओळख असलेल्या या विमानाला तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तेजस हे नाव दिले होते. या विमानाचे इंजिन एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने विकसित केलेले आहे.

आधुनिक युगात जगातील सर्वांत हलके व छोटे लढाऊ विमान म्हणून तेजस या विमानाची ख्याती असून प्रचंड वेग आणि लक्ष्य अचूक टिपण्याच्या क्षमतेमुळे आज या विमानाची जगभर चर्चा आहे. या विमानाचे कॉकपीट काचेचे असून सर्व प्रकारची क्षेपणास्त्रे डागण्याची या विमानाची क्षमता आहे.
हवे स्थिर राहण्याची अफलातून क्षमता
या विमानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हवेत एका जागी काही वेळ स्थिर राहण्याचे कौशल्य या विमानात आहे. शिवाय यात आधुनिक रडार यंत्रणा असून ताशी १९२० किमी वेगाने ते उडू शकते.
भारतीय बनावटीमुळे जगभरात उत्सुकता
या विमानाची बांधणी संपूर्ण भारतीय बनावटीची असून हलके वजन व अधिक क्षमता यामुळे ही विमाने निर्मितीनंतर जगभरात चर्चेत आली होती. आता तज्ज्ञांना ती प्रत्यक्षात पाहावयास मिळतील.