आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगण निर्मितीची उलटगणती सुरू, राज्य निर्मितीसाठी दोन जूनची तारीख निश्चित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली 2 जून ही तारीख जवळ येत असतानाच आता या प्रक्रियेची उलटगणती आता सुरू झाली आहे.
संपत्ती, कर्ज आणि कर्मचारी यांचे विभाजन करण्याचे प्रचंड आव्हान पार करण्याची प्रक्रिया एकीकडे सुरू आहे, तर दुसरीकडे आंध्र प्रदेश पुनर्गठन विधेयक मंजूर करताना संसदेत निर्माण झालेली कटुता अजूनही कायम आहे. अनेक कर्मचारी हैदराबादमध्ये स्थायिक झाले आहेत. मात्र, आता राज्याच्या विभाजनामुळे उर्वरित आंध्र प्रदेशात जाण्याचे संकट ओढवणार असल्याने सीमांध्रमधील अनेक कर्मचारी नाराज आहेत.
कर्मचारी विभाजनाचा काय आहे वाद?
कर्मचार्‍यांचे विभाजन करताना ‘मूळ नागरिकत्व’ हा निकष असावा, अशी मागणी तेलंगण कर्मचारी संघटनांनी केल्याने वाद निर्माण झाला होता. दुसरीकडे सीमांध्रमधील कर्मचार्‍यांनी तेलंगणच्या सचिवालयात काम करू नये, असे मत स्वतंत्र तेलंगण राज्याचे पहिले मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास सज्ज असलेले टीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केले होते. नोकर्‍यांसंदर्भात अन्याय झाला असल्यानेच आम्ही स्वतंत्र राज्य निर्मितीसाठी लढा दिला, मग आता जर सीमांध्रमधील कर्मचारी तेलंगण सरकारमध्येच कायम राहणार असतील, तर मग स्वतंत्र तेलंगण राज्य मिळवून काय हशील झाले, असा प्रश्न तेलंगण समर्थक करत आहेत.
टीआरएसची वॉर रूम आणि नायडूंचा संताप
सीमांध्रमधील कर्मचार्‍यांची एकत्रित यादी तयार करण्यासाठी टीआरएसनेही कार्यालयात एक ‘वॉर रूम’ तयार केली. टीआरएसच्या या वॉर रूममुळे तेलगू देसमचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे नियोजित मुख्यमंत्री मंगळवारी चांगलेच संतप्त झाले होते. आता ‘वॉर रूम’ नको तर ‘पीस रूम’ आवश्यक आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली होती.
राजधानीचा शोध सुरूच
नवीन आंध्र प्रदेशासाठी नवीन राजधानीचा शोध यावरही सध्या लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. विजयवाडा आणि गुंटूर हा भाग मध्यवर्ती भागात येत असल्याने तेथे राजधानी होऊ शकते, असा एक मतप्रवाह आहे. विजयवाडा-गुंटूरव्यतिरिक्त उत्तर सीमांध्रमधील विशाखापट्टणम, कुर्नूल आणि रायलसीमामधील तिरुपती येथे राजधानी करावी, अशी विविध गटांची मागणी आहे.
घराबाहेर पडणे वेदनादायक
आता आम्हाला येथून बाहेर पडावे लागणार असेल, तर ती बाब आमच्यासाठी निश्चितच वेदनादायक आहे. आम्ही येथे घर बांधले. आमच्या मुलांचे शिक्षणही अर्धवटच आहे.
-सीमांध्रमधील एक कर्मचारी