आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Telangana: TRS President Chandrasekhar Rao Meets Sonia Gandhi News In Marathi

टीआरएस चंबुगबाळे आवरणार किरणकुमार रेड्डींची नवी चूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तेलंगण निर्मिती झाल्यामुळे तेलंगण राष्ट्र समिती पक्ष (टीआरएस) स्थापन करण्याचा उद्देश सुफळ, संपूर्ण झाला असून आता या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करणार असल्याची चर्चा आहे, तर तेलंगण मुद्द्यामुळे काँग्रेसला रामराम करणारे आंध्र प्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी आपला नवा पक्ष स्थापन करण्याची शक्यता आहे. टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी रविवारी सोनिया गांधींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

रेड्डी यांनी नवा पक्ष स्थापन करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. रविवारी यासाठी बैठकही घेतली. तेलंगण मुद्द्यावरून काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले सहा खासदार आणि काही जवळचे मंत्री या बैठकीसाठी उपस्थित होते. रेड्डी यांनी नवा पक्ष स्थापन करावा यासाठी सीमांध्रच्या खासदारांनी आग्रह धरला आहे. या सर्वांनीच रविवारी नव्या पक्षाच्या आराखड्यासंदर्भात प्रदीर्घ चर्चा केली. उद्या सोमवारीही रेड्डी आपल्या समर्थकांसमवेत याविषयी सल्लामसलत करणार आहेत. लोकसभेत तेलंगण विधेयक पारित झाल्यानंतर किरणकुमार यांनी मुख्यमंत्रिपद आणि काँग्रेसचा राजीनामा दिला होता.

राव दहा जनपथवर
लोकसभा निवडणुकीसाठी युती अथवा काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात असताना रविवारी सकाळीच चंद्रशेखर राव काँग्रेस अध्यक्षा सोनियांच्या निवासस्थानी धडकले. तेलंगण निर्मितीबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी सोनियांची भेट घेतली. या बैठकीत राजकारणावर चर्चा झाली नाही, असा दावाही त्यांनी केला. काँग्रेस प्रभारी दिग्विजयसिंह यांच्या संपर्कात राहा, असे सांगण्यात आले असून सोनियांची पुन्हा भेट घेणार असल्याचे राव म्हणाले.

काँग्रेसचा निर्णय नाही
रेड्डी यांनी राजीनामा दिल्यानंतर आतापर्यंत काँग्रेसने काहीही हालचाल केलेली नाही. नवे मंत्रिमंडळ सत्तेवर येईपर्यंत राज्यपालांनी रेड्डी यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले आहे. मात्र, राज्यात नवा मुख्यमंत्री नियुक्त करायचा की राष्ट्रपती राजवट लागू करायची, हा निर्णय काँग्रेसने घेतलेला नाही.

इतर नेत्यांच्याही गाठीभेटी
तेलंगण भागातील इतर नेत्यांनीही शनिवारी सोनियांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर टीआरएसचे लवकरच काँग्रेसमध्ये विलीनीकरण व्हावे, अशी काँग्रेसची इच्छा आहे, असे केंद्रीय मंत्री एस. सत्यनारायण म्हणाले होते. तेलंगणची निर्मिती झाल्यानंतर आपण सोनियांसोबत काम करणार असल्याचे राव यापूर्वी सांगत होते. आता विधेयक पारित करण्यात आले असून त्यांनी सोबत यायला हवे, असे सत्यनारायण म्हणाले.