आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जय सीमांध्र\'च्या नार्‍याने संसद दणाणली; काँग्रेसचे सहा खासदार बडतर्फ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आंध्रच्या विभाजनाला विरोध करणार्‍या तसेच केंद्राविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची नोटीस देणार्‍या सहा खासदारांना काँग्रेसने मंगळवारी बडतर्फ केले. सब्बाम हरी, जी. व्ही. हर्षकुमार, व्ही. अरुणकुमार, एल. राजगोपाल, आर. संबाशिव राव आणि ए. साईप्रताप अशी या खासदारांची नावे आहेत.
केंद्र सरकारने आंध्रचे विभाजन करून तेलंगणा राज्यनिर्मितीला मंजुरी दिल्यानंतर आंध्र प्रदेश काँग्रेसमध्येही नाराजीचा सूर आहे. स्वत: किरणकुमार रेड्डी यांनीही राजीनाम्याची तयारी चालवली असून दिल्लीत काँग्रेस खासदार आक्रमक झाले आहेत. तेलंगणाला विरोध करणारे खासदार सब्बाम हरी यांनी तर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची नोटीस देणार्‍या सहा खासदारांना बडतर्फ करण्याच्या पक्षाच्या शिस्तपालन समितीची शिफारस मंजूर केली असल्याचे काँग्रेसच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
एकीकडे केंद्रीय काँग्रेस नेते स्वतंत्र तेलंगणासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगत असताना राज्य काँग्रेसमधूनच विरोध सुरू झाल्याने तो दाबून टाकण्यासाठी पक्षाने या सहा खासदारांवर कारवाई केली असल्याचे मानले जाते. यामुळे केंद्रीय नेतृत्व किती कठोर आहे, हा संदेश राज्यात जाईल आणि तेलंगणाला होणारा विरोध काही प्रमाणात कमी होईल, असा केंद्रीय काँग्रेस नेत्यांचा होरा आहे.
दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून स्वतंत्र राज्याच्या मागणीवरून आंध्र प्रदेशातील खासदारांचा परस्परविरोधी गट तेल ओतत असल्यामुळे संसदेत तेलंगणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. परिणामी, तेलंगणासह अन्य मुद्दय़ांवरून लोकसभा व राज्यसभेचे कामकाज पाचव्या दिवशीही ठप्प झाले. लोकसभेचे कामकाज सकाळच्या सत्रात एकदा आणि राज्यसभेचे कामकाज चार वेळा तहकूब केल्यानंतर दोन्ही सभागृहांचे काम दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.