आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीसाठी मार्चपूर्वी निविदा, स्मार्ट औरंगाबादच्या दिशेने पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक
नवी दिल्ली - दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडाॅरमध्ये (डीएमआयसी) समावेश असलेल्या औरंगाबादनजीकच्या शेंद्रा-बिडकीन आणि गुजरातमधील ढोलेरा या गावांचे स्मार्ट सिटीत रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्मार्ट सिटीच्या निविदा लवकरच काढण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. दोन्ही प्रस्तावित स्मार्ट सिटीचा मास्टर प्लॅन तयार असल्याचे औद्योगिक धोरण व प्रोत्साहन मंडळाच्या (डीआयपीपी) वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
फिक्कीतर्फे आयोजित एका कार्यक्रमात डीआयपीपीचे अतिरिक्त सचिव शत्रुघ्न सिंह म्हणाले, डीएमआयसीत येणा-या २२ गावांचे रूपांतर स्मार्ट सिटीमध्ये करण्यात येणार आहे. त्यातील सात गावांचा पहिल्या टप्प्यात कायापालट करण्यात येईल. प्रारंभीच्या काळात महाराष्ट्रातील शेंद्रा-बिडकीन व गुजरातेतील ढोलेराचा विकास स्मार्ट सिटी म्हणून करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. या नियाेजित स्मार्ट सिटीचा मास्टर प्लॅन तयार असून, चालू आर्थिक वर्षात निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
एसपीव्हीमार्फत विकास
शेंद्रा -बिडकीन व ढोलेरा गावांचा विकास करताना स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही) नियुक्त करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. या गावातील पायाभूत सुविधांचा विकास करताना व वाहतुकीसाठी एसपीव्ही महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसपीव्ही ही विशिष्ट हेतूने स्थापन करण्यात येणारी महामंडळ किंवा कंपनीसारखी यंत्रणा असते.
स्मार्ट सिटी काय ?
जेथे सामाजिक, आर्थिक गुंतवणुकीसह अतिउच्च दर्जाचे राहणीमान, वाहतूक व्यवस्था, पर्यावरण, कुशल व प्रभावी व्यवस्थापन असते अशा शहरांना स्मार्ट सिटी म्हणतात. दुबई, कोपनहेगन, अॅमस्टरडॅम, व्हिएन्ना, पॅरिस ही जगातील काही स्मार्ट सिटीची उदाहरणे.
औरंगाबादला फायदा शेंद्रा-बिडकीन स्मार्ट सिटीचे काम सुरू झाल्यास औरंगाबादच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होती. या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योग प्रस्तावित असल्याने तांत्रिक, अतांत्रिक तसेच कुशल व अकुशल अशा साधारणत: ३ लाख रोजगार संधी निर्माण होतील.