आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरप्रश्नी चर्चा करण्याचा प्रस्ताव भारताने फेटाळला, पाकिस्तानला बजावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद/नवी दिल्ली - काश्मीरप्रश्नी परराष्ट्र स्तरावर चर्चा करण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव भारताने बुधवारी फेटाळून लावला. जम्मू आणि काश्मीरमधील सध्याच्या स्थितीत सीमापार दहशतवाद हाच मध्यवर्ती मुद्दा आहे, या मुद्द्यावर चर्चा करण्यास आमची तयारी आहे, असे भारताने स्पष्ट केले.

पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव इयाझ अहमद चौधरी यांनी काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्याचे निमंत्रण भारताच्या परराष्ट्र सचिवांना पाठवले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी इस्लामाबादला जाण्याची इच्छा तर व्यक्त केली, पण जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे त्यावर चर्चा करण्याचा पाकिस्तानला अधिकार नाही, फक्त काश्मीरमधील सीमापार दहशतवाद आणि घुसखोरीला आळा घालण्याच्या मुद्द्यावरच चर्चा होऊ शकते, असेही जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले. भारताची ही भूमिका पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावाले यांनी पाकला कळवली. पाकिस्तानने गेल्या सोमवारी भारताला काश्मीरवर चर्चा करण्याचे निमंत्रण दिले होते. काश्मीर मुद्द्यावर दोन्ही देशांत शाब्दिक युद्ध सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हा प्रस्ताव दिला होता.

४० व्या दिवशीही संचारबंदी : काश्मीरमधील श्रीनगर जिल्हा, अनंतनाग शहर आणि मगाम भागात संचारबंदी जारी होती. राज्यातील जनजीवन ४० व्या दिवशीही विस्कळीत झाले होते. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बडगाम जिल्ह्यातील मगाम भागात मंगळवारी सुरक्षा दलांच्या गोळीबारात चार जण ठार झाले. त्यानंतर तेथे तसेच श्रीनगर आणि अनंतनागमध्ये संचारबंदी लावण्यात आली आहे. खोऱ्यात इतर ठिकाणी लोकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

लष्करी ताफ्यावर हल्ला, ३ जवान शहीद
दहशतवाद्यांनी मंगळवारी मध्यरात्री लष्कराच्या वाहनांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात २ जवान आणि १ पोलिस कर्मचारी असे तिघे जण शहीद झाले. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी बारामुल्ला जिल्ह्यातील ख्वाजाबाग येथे मध्यरात्री अडीच वाजता लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात लष्कराचे २ जवान आणि १ पोलिस कर्मचारी असे तिघे जण शहीद झाले, तर २ जवान आणि १ पोलिस कर्मचारी असे तिघे जखमी झाले. हल्ला केल्यानंतर दहशतवादी पळून गेले. त्यांना शोधण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

युनोच्या मानवी हक्क उच्चायुक्तांचे आवाहन
संयुक्त राष्ट्रांचे मानवी हक्कविषयक उच्चायुक्त झैद राद अल-हुसैन यांनी जम्मू आणि काश्मीर तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. स्थितीचा आढावा घेण्यासाठी आमच्या पथकाला या दोन्ही भागांत प्रवेश द्यावा, असे आवाहनही त्यांनी भारत आणि पाकला केले.
बातम्या आणखी आहेत...