आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशतवाद्याची अटक वादात, पोलिसांच्या परस्परविरोधी दाव्यांनी गोंधळ वाढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हिजबुल मुजाहिदीनचा संशयित दहशतवादी लियाकत अली शाहच्या अटकेची चौकशी होण्याची शक्यता आहे. लिकायत प्रकरणात दिल्ली आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी परस्परविरोधी दावे केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला असून त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालय अटक प्रकरणी दोन्ही राज्यांनी केलेल्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहत आहे.
केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांनी सांगितले की, दोन्ही राज्यांच्या दाव्याची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर गरज भासल्यास चौकशीचे निर्देश देण्यात येतील. लियाकत शाह दहशतवादी आहे. तो नेपाळमार्गे भारतात आला होता. अफजल गुरूच्या फाशीचा बदला घेण्यासाठी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला करण्याच्या कटात तो सहभागी असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. लियाकतला उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे अटक करण्यात आली होती. जम्मू काश्मीर पोलिसांनी मात्र दिल्ली पोलिसांच्या दाव्याच्या अगदीच विरुद्ध दावा केला आहे. त्यांच्या मते लियाकत जम्मू काश्मीर सरकारच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत भारतात परत येत होता. त्याची माहिती बीएसएफलाही होती. त्याच्या नातेवाइकांनी 5 फेब्रुवारी 2011 रोजी या योजनेअंतर्गत त्याच्या परतीसाठी राज्य सरकारकडे अर्ज केला होता. रविवारपर्यंत तो आपली पत्नी आणि मुलीसोबत काश्मीरमध्ये पोहोचू शकतो, असे त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले होते, असे जम्मू काश्मीर पोलिसांचे म्हणणे आहे. या योजनेअंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधून 2011 मध्ये 150 आणि 2012मध्ये 115 दहशतवादी मुख्य प्रवाहात परत आले आहेत.

पोलिसांकडून विश्वासघात
दिल्ली पोलिसांनी लियाकतच्या अटकेचे नाटक रचले आहे. आपल्या पतीला नेपाळ सीमेवरून गोरखपूरपर्यंत पोलिस बंदोबस्तात आणण्यात आले होते, असा आरोप लियाकतची दुसरी पत्नी अख्तर उल निशा हिने केला आहे. परत येणार्‍या काश्मिरींशी पोलिस असे वर्तन करत असतील तर परत कोण येईल, असा सवालही तिने केला आहे.

‘संजूबाबा अतिरेकी नाही’
1993च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेत पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झालेला चित्रपट अभिनेता संजय दत्तच्या बचावासाठी काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग धावून आले आहेत. संजय दत्तने हा गुन्हा ‘तारुण्यात’ केला आहे. तो काही दहशतवादी नाही, असे सिंग यांनी म्हटले आहे. संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांनी जातीयवाद्यांविरोधात भूमिका घेतली होती आणि अल्पसंख्याकांची बाजू घेतली होती. त्यामुळे एका मुलाची प्रतिक्रिया म्हणून संजयने चूक केली असावी. त्याची शिक्षा त्याने भोगलीही आहे. तो गुन्हेगार किंवा दहशतवादी नाही. त्यामुळे राष्ट्रपतींनी त्याच्या शिक्षेच्या माफीवर विचार करायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे.