आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौप्यस्फोट: दहशतवादी हल्ल्यासाठी पाकने पाठवला भारतात दारूगोळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी खळबळजनक गौप्यस्फोट केला. देशातील शीख दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत असून त्यासाठी लागणारे आरडीएक्स, दारूगोळा आणि अन्य स्फोटके सीमेपलीकडून पंजाबात पोहोचवण्यात आली असल्याचे शिंदे यांनी प्रथमच जाहीररीत्या सांगितले.

राजधानी नवी दिल्लीमध्ये आयोजित मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत सुरक्षाविषयक परिषदेत बोलताना शिंदे यांनी ही खळबळजनक माहिती उघड केली. या परिषदेत पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादलही हजर होते. शिंदे म्हणाले की, पाकिस्तानमध्ये आयएसआयच्या तळांवर पंजाबमधील शीख युवकांना दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये राहणाºया शीख तरुणांचाही भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. या तरुणांचा भारतातील पंजाब व अन्य राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्यांसाठी वापर करण्याचा आयएसआयचा कट आहे. केंद्र सरकारने याबाबत सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आखात व नेपाळमार्गे येत आहे पैसा : भारतातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानमधून आखाती देशांमध्ये पैसा पाठवण्यात येत आहे. तेथून तो नेपाळमध्ये आणि नेपाळमधून वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर व हवालामार्गे भारतात पाठवण्यात येत असल्याचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत सांगितले.

... तर मोठी किंमत मोजावी लागेल : एनसीटीबाबत चिदंबरम यांचा इशारा
राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्र (एनसीटीसी) अस्तित्वात आले नाही तर देशाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी बुधवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला. एनसीटीच्या सुधारित स्वरूपालाही विरोध होत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. गृहमंत्री असताना चिदंबरम यांनीच एनसीटीसीची संकल्पना मांडली होती.

अंतर्गत सुरक्षेबाबत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत ते बोलत होते. तत्पूर्वी या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राच्या सुधारित स्वरूपाला विरोध केला होता. एनसीटीसीची विद्यमान रचना संघराज्य शासन प्रणालीच्या सिद्धांतांना अनुसरून नाही. हा एक प्रकारे संघीय पोलिस स्थापन करण्याचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये या पोलिसांचा दुरुपयोग करण्यात येईल, अशी आपणास भीती वाटत असल्याचे मोदी म्हणाले. गुजरातसह अनेक राज्यांनी एनसीटीच्या रचनेला कडाडून विरोध केला आहे.अंतर्गत सुरक्षेवर विचारविमर्श करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ही बैठक बोलावण्यात आली होती. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीत सहभागी झाल्या नाहीत. परंतु गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, जम्मू-काश्मीर या बिगर काँग्रेसशासित राज्यांनी या बैठकीत भाग घेतला.

मोदींनी घेतली आक्रमक भूमिका
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकार सुरक्षा दलांचा राजकीय दुरुपयोग करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी अंतर्गत सुरक्षेवर श्वतेपत्रिका जाहीर करण्याची मागणीही केली. नंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आजच्या परिषदेत मी काही कठोर मते मांडली. अंतर्गत सुरक्षेशी तुमचा संबंधच नाही, तुम्ही राजकीय स्वार्थासाठी सुरक्षा संस्थांचा वापर करू लागला आहात. तुम्ही या संस्थांचे वाटोळे करत आहात, असे मी सरकारला सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी अनेक सूचना केल्या आहेत. त्यावर काय पावले उचलण्यात आली हे देशाला माहीत झाले पाहिजे, असे मोदी म्हणाले.