आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादी हाफिज सईदचे मिशन काश्मीर, निवडणुकीत गोंधळ माजवण्याचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर/ नवी दिल्ली - कुख्यात दहशतवादी आणि २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदने सध्या आपला मुक्काम व्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये हलवला असून येथे एका दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळावर त्याचा वावर वाढला आहे. गुप्तचरांनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीत गोंधळ व हिंसाचार माजवण्यासाठी सईदने कंबर कसली असून त्यासाठी त्याने जोरदार तयारी चालवली आहे.

सईदचे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेची घनिष्ठ संबंध असून काश्मीर खो-यात ७ सप्टेंबरला आलेल्या पुरामुळे बेघर झालेल्या कुटुंबातील मुलांची संघटनेत भरती करावी, असे आवाहन त्याने तोयबाला केले आहे. पुरानंतर राज्य व केंद्र सरकारवर प्रचंड नाराज असलेले काश्मिरी युवक या काळात दहशतवादाचा मार्ग सहज अवलंबू शकतील, असा सईदचा दावा आहे. या परिस्थितीचा लाभ लष्कर-ए-तोयबाने उचलावा, असे त्याने म्हटले आहे. भारतीय गुप्तहेर संस्थांनी केलेल्या दाव्यानुसार सईद सध्या व्याप्त काश्मीरमध्ये असून या पूरग्रस्त भागांतील युवकांना सध्या तो भडकावत आहे. या युवकांनी दहशतवादी संघटनेत सहभागी व्हावे म्हणून त्याने प्रयत्न चालवले आहेत.

हीच योग्य वेळ : सूत्रांनुसार, व्याप्त काश्मीरमध्ये आलेल्या पुरामुळे हजारो लोक बेघर झाले असून या लोकांना पाक सरकार किंवा व्याप्त काश्मीर सरकारकडून मदत मिळालेली नाही. हजारो युवक सध्या बेरोजगार आहेत. या सर्वांना आपल्या संघटनेत सामील करून घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे लष्कर-ए-तोयबाला वाटते.

भारतात इशारा
लष्कर-ए-तोयबाने व्याप्त काश्मीरमध्ये हाफिज सईदच्या माध्यमातून चालवलेले प्रयत्न पाहता भारती गुप्तहेर संस्थांनी दिल्ली व जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यांत दक्षतेचा इशारा दिला आहे. आगामी काळात दिल्लीतील वकिलाती तसेच वारसास्थळांवर हल्ले केले जाण्याची शक्यता असल्याचे या गुप्तचरांचे म्हणणे आहे.

रोजगार देण्याची गरज
हाफिज सईदच्या व्याप्त काश्मीरमधील मुक्कामामुळे भारतीय काश्मीरमधील युवकांची दिशाभूल करून त्यांना लष्कर-ए-तोयबासारख्या संघटनेत सहभागी करून घेतले जाऊ शकते. सध्या पुरस्थितीनंतर निर्माण झालेल्या बेरोजगारीवर तातडीने उपाययोजना करून काश्मीरमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज एका संरक्षण तज्ज्ञाने व्यक्त केली आहे.