आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Lakhvi In Jailed, Pakistan Charged Other Case On Him

अतिरेकी लख्वी जेलमध्येच, चोहीकडून दबाव वाढताच पाकने केली दुस-या प्रकरणात अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र - नवी दिल्लीत शुक्रवारी हिंदू सेनेने लख्वी आणि नवाझ शरीफांच्या प्रतिमांचे दहन केले.
नवी दिल्ली / इस्लामाबाद - मुंबईवरील २६ / ११ च्या हल्ल्याचा आरोपी झकी-उर-रहेमान लख्वीला पाकिस्तानात जामीन देण्याला भारतात तीव्र विरोध झाला. लोकसभेने निंदाव्यंजक प्रस्ताव मंजूर करून न्यायालयाच्या निर्णयाची तीव्र निंदा केली व कोणत्याही परिस्थितीत लख्वीला सोडू नका, अशी मागणी पाककडे केली. या दबावानंतर पाकने लख्वीला दुस-या एका प्रकरणात अटक करून तीन महिन्यांसाठी तुरुंगात डांबले.

लख्वी बाहेर आल्यास शांतता भंग होण्याची शक्यता आहे, म्हणून त्याला आता तुरुंगात ठेवण्यात आले आहे. मुंबई हल्ला खटल्यात त्याला मिळालेल्या जामिनाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णयही पाकिस्तानने घेतला आहे. लख्वी लष्कर - ए- तोएबाचा ऑपरेशन्स कमांडर आहे. २००८ च्या २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यावेळी हल्लेखोरांना निर्देश देत होता. त्यानेच हल्लेखोरांना प्रशिक्षण दिले होते.

दोघांना फाशी : फाशीच्या शिक्षेवरील बंदी उठवल्यानंतर पाकमध्ये शुक्रवारी लष्करी मुख्यालयावरील हल्ल्याचा दोषी अकील उस्मान व तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्यावरील हल्ल्याचा दोषी अरशद महमूद या दोघांना फासावर लटकवण्यात आले आहे.

कांगावा खोटा : स्वराज
पाकने कोर्टाचा निर्णय फिरवण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत, अशी आमची मागणी आहे. आम्ही त्यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत. लख्वीविरुद्ध पुरावे नाहीत, हा पाकचा युक्तिवादही भारताला मान्य नाही. मुंबई हल्ल्याचा कट पाकमध्येच शिजला. त्याचे ९९ टक्के पुरावेही पाकिस्तानातच आहेत, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या.

मानवतावाद्यांना धक्का पोहोचवणारे कृत्य : मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सरकार यापुढेही सभागृहाच्या भावनांनुसारच पावले उचलेल. आम्ही कठोर शब्दांत त्यांना संदेश पोहोचवला आहे. पाकिस्तानात एवढा मोठा हल्ला झाल्यावरही असे कृत्य (लख्वीला जामीन) होणे हे प्रत्येक मानवतावाद्याला धक्का पोहोचवणारे आहे.

अध्यक्षांनी वाचला प्रस्ताव
लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी प्रस्ताव वाचला. २६/११ प्रकरणात ठोस निर्णयाप्रत पोहोचण्यासाठी पाकवर दबाव टाकावा, असा आग्रह सभागृहाने केंद्राकडे धरला आहे. पाकने त्यांच्या भूमीतील अतिरेक्यांची पाळेमुळे उखडावी व भारतात त्यांना नापाक कारवाया करता येऊ नये याचीही काळजी घ्यावी, असे त्यात म्हटले आहे.

पाकिस्तानी तुरुंगात ५४ बेपत्ता भारतीय सैनिक
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९६५ आणि १९७१ मधील युद्धादरम्यान बेपत्ता झालेले ५४ भारतीय सैनिक पाकिस्तानी तुरुंगात खितपत आहेत; परंतु पाकिस्तानने आपल्या कैदेत एकही भारतीय नसल्याचा कांगावा केला आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी लोकसभेत ही माहिती दिली.

पाकिस्तानातील तुरूंगात कैद असलेल्या भारतीयांमध्ये बीएसएफचा एक जवान देखील सामील आहे. परंतु असा एकही कैदी तुरूंगात नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. वास्तवात मात्र १९७१ च्या युद्धाच्या ३३ वर्षांनंतरही अनेकांचा काहीही पत्ता लागलेला नाही. त्यांच्या कुटुंबियांनी मात्र सातत्याने ते पाकिस्तानच्या तुरूंगात असल्याचे म्हटले आहे. काहींना आपल्या नातेवाईकांची पत्रेही मिळाली आहेत. परंतु अनेक वर्षे संघर्ष करूनही अशा कुटुंबांच्या पदरी निराशा आली आहे.

‘आम्ही पाकिस्तानच्या भूमिकेची निंदा करतो’
‘मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या हल्ल्यातील १६६ लोकांच्या हत्येचा मुख्य आरोपी झकी-उर - रहेमान लख्वीला जामीन देण्याच्या निर्णयाची हे सभागृह एका सुरात निंदा करत आहे. आम्ही खटल्याला विलंब आणि पाकिस्तान सरकारच्या भूमिकेचीही निंदा करतो. त्यामुळेच एका आरोपी अतिरेक्याला जामीन मिळाला आहे. १४५ निष्पाप मुले आणि अन्य लोकांची नृशंस हत्या झाल्याच्या एक दिवसानंतरच त्याच देशाने एका आरोपी अतिरेक्याला जामिनावर सोडून दिले, यामुळे आम्ही चिंताक्रांत आहोत. अतिरेक्यांशी कोणतीही तडजोड करू नये, हा धडा पाकिस्तानने शिकलाच नाही, असेच यावरून वाटते. लख्वीच्या जामिनाविरुद्ध अपील करण्याच्या घोषित इच्छेनुसार पाक सरकारने कठोरपणे पावले टाकावीत. अशा व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन आम्ही पाकिस्तान सरकारला करतो.’
(लोकसभेतील निंदा प्रस्ताव)