आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Salauddin Was Ready For Return To India

दहशतवादी सलाउद्दीन तेव्हाच भारतात परतण्यास तयार होता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रॉ या भारतीय गुप्तहेर संस्थेचे माजी प्रमुख ए. एस. दुलाट यांच्या पुस्तकातून केंद्र सरकारमधील कारभाराची अनेक रहस्ये उलगडत चालली आहेत. या पुस्तकानुसार, बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन भारतात परतण्यास तयार होता. आजही तो तयार आहे. मात्र, सरकारने त्याबाबतच्या योजना आखणीवरच विनाकारण वेळ वाया घालवला.

'काश्मीर : द वाजपेयी ईयर्स' या पुस्तकाचे लेखक असलेले दुलाट रॉमधून सन २००० मध्ये निवृत्त झाल्यानंतर दुलाट वाजपेयी सरकारमध्ये काश्मीरविषयक विशेष सल्लागार म्हणून कार्यरत होते. सन २००४ मध्ये निवडणुकीत पराभव झाल्यानंतर वाजपेयींनी गुजरातमध्ये भाजपच्या हातून चूक झाल्याचे मान्य केले होते, असा उल्लेख या पुस्तकात आहे. याशिवाय दहशतवादी सलाउद्दीनच्या मुलास जम्मूतील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देतानाही राजकीय वजन वापरण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

यासाठी सलाउद्दीन याने श्रीनगर आयबीचे प्रमुख के. एम. सिंह यांना दूरध्वनी केला होता. यात तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांनीही मदत केली होती, असे दुलाट म्हणतात.

रॉमध्ये काश्मीरबाबत उदासिनता
२००१ मध्ये सलाउद्दीन भारतात येण्यास तयार होता. मी शंभरदा यासाठी प्रयत्न केले. नंतरच्या काळात पंतप्रधान कार्यालयातून मी या प्रश्नावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्कालीन रॉ प्रमुख विक्रम सूद यांना ते पटले नसावे. माझ्या निवृत्तीनंतर रॉमध्ये काश्मीरबाबत कायम उदासिनता होती, असेही दुलाट यांनी पुस्तकात म्हटले आहे.

सलाउद्दीनची भारताशी चर्चेची तयारी
१९९०च्या दशकात माजी मुख्यमंत्री मीर कासिम यांच्याशी सलाउद्दीनने चर्चा केली होती. दहशतवाद्यांशी राज्य सरकार चर्चा करणार असेल तर कृपया मला विसरू नका, असा स्पष्ट निरोप सलाउद्दीनने कासिम यांना दिला होता, असे पुस्तकात नमूद आहे.

दुलाट यांना अजूनही येतात निरोप
दुलाट म्हणतात, सलाउद्दीन याचे अजूनही निरोप येतात. त्याला तेव्हाच भारतात यावयाचे होते. अशात आलेले निरोप मी सरकारला कळवतो. कुणी याची दखल घेत असेल, अशी माझी धारणा आहे... २० वर्षांपासून एक मित्र पाकिस्तानात अडकून पडला आहे...

यासिन मलिकने टर उडवली
दुलाट यांनी पुस्तकात सलाउद्दीनबद्दल दिलेल्या संदर्भाची काश्मीरमधील फुटीरवादी गटाचा नेता यासिन मलिक याने टर उडवली आहे. दुलाट आमच्यासारख्या नेत्याची तुलना काय एका विमानाच्या तिकिटाशी करत आहे का?, मी २३ वर्षांपासून प्रवास करतो. याचे पैसे काय दुलाट साहेबांनी दिले आहेत का, असे मलिक याने म्हटले आहे. यपूर्वी एका मुलाखतीत दुलाट यांनी यासिन मलिक व सय्यद अली शाह गिलानी यांची रुग्णालयाची बिले रॉ ने चुकती केल्याचे म्हटले होते.