आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार पोलिसाविरुद्ध सनदी अधिकाऱ्यांनी केली तक्रार, दोन अधिकाऱ्यांना अटक केल्याप्रकरणी उद्रेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय सनदी अधिकारी संघटनेने बिहार सरकार आणि केंद्राने हस्तक्षेप करून बिहार पोलिसांच्या वर्तनावर लगाम घालावा, अशी मागणी केली आहे. राज्यातील अधिकाऱ्यांशी त्यांचे वर्तन आक्षेपार्ह असल्याचे आयएएस संघटनेचे म्हणणे आहे. 
 
केंद्रीय आयएएस अधिकारी संघटनेत ४,९२६ अधिकारी सदस्य आहेत. देशभरात हे अधिकारी विविध पदांवर नियुक्त असून बिहार पोलिसांच्या वर्तनावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. सीबीआयसारख्या स्वतंत्र यंत्रणेकडून सनदी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. मात्र पोलिस थेट अटक कशी करू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.  
 
सनदी अधिकाऱ्यांविरुद्ध बिहार पोलिस हेतुपुरस्सर दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही याबद्दल संघटनेने आश्चर्य व्यक्त केले.  काही पोलिस अधिकारी बेलगाम वर्तन करत असल्याचा आरोप संघटनेचे सचिव संजय भुसरेड्डी यांनी केला.
 
तरुण आयएएस अधिकारी जितेंद्र गुप्ता हे मोहानिया येथे उपविभागीय दंडाधिकारीपदी नियुक्त आहेत. त्यांना बनावट प्रकरणात गोवण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. दुसरे सनदी अधिकारी सुधीर कुमार हे बिहार स्टाफ सिलेक्शन कमिशन हजारीबागचे अध्यक्ष आहेत. त्यांनाही बेकायदेशीररीत्या कैदेत टाकल्याबद्दल संघटनेने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.  

दोन अधिकाऱ्यांना केली अटक 
भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी जितेंद्र गुप्ता आणि सुधीर कुमार यांना अटक करण्यात आले. या दोघांची बिहारमध्ये नियुक्ती आहे. संघटनेने या प्रकरणी सर्व बाजू तपासून पाहिल्या असून ही कारवाई आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा संघटनेने उपस्थित केलाय. कायद्याच्या मर्यादा त्यांनी ओलांडल्या असल्याचे संजय म्हणतात. पोलिसांच्या हेतूची कस्सून चौकशी करावी, असे मत आयएएस संघटनेने मांडले आहे. स्वतंत्र यंत्रणेकडून अधिकाऱ्यांची चौकशी होणे अपेक्षित होते.
 
बातम्या आणखी आहेत...