आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्मिळ आजारांवर राष्ट्रीय धोरणाचा मसुदा विचाराधीन; निर्वासितांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संसदेचे सत्र आज विविध महत्त्वपूर्ण निर्णय, चर्चा, आरोप-प्रत्यारोप आणि मागण्यांचे ठरले. दुर्मिळ आणि असाध्य आजारांच्या उच्चाटनासाठी राष्ट्रीय धोरण आखणीचा निर्णय घेणार असल्याचे केंद्राने सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्रालय ई-फार्मसीज संकल्पनेअंतर्गत  तज्ज्ञ डॉक्टर, औषधाचे स्रोत आणि रुग्णांदरम्यान सेतूसारखे काम करेल.   

द नॅशनल हेल्थ सिस्टिम्स रिसोर्सेस सेंटर या धोरणाचा मसुदा तयार करत आहे. भारतात असलेल्या दुर्मिळ आजारांवर यात प्रामुख्याने भर दिला जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत सांगितले.  

दुर्मिळ आजारांची यादी, त्यांचे उपलब्ध उपचार, आर्थिक साहाय्य अशा तीन स्तरांवर या धोरणात विचार केला आहे. याविषयीचा मसुदा सार्वजनिक चर्चेसाठी खुला केला जाणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री फाग्गन सिंग यांनी सांगितले. उपलब्ध सेवांचा आढावा सरकार घेत आहे. 

अवैध स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून वाद पेटला
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी अवैधरीत्या भारतात राहत असणाऱ्या स्थलांतरितांना हद्दपार करण्याची मागणी केली आहे. दहशतवादी आणि असामाजिक कार्यांमध्ये ते गुंतले असल्याचे दुबे म्हणाले. ईशान्य भारतातदेखील असे अनेक घुसखोर राहत अाहेत. दुबे यांच्या या प्रस्तावाला विरोधी बाकांवरून जोरदार विरोध झाला. आधार कार्ड मिळवून अधिकृत नागरिकत्व घेत असल्याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली.  काँग्रेस नेता शशी थरूर यांनी दुबेंच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध केला. 

निर्वासितांविषयी अपप्रचार करण्याचे कारस्थान दुबे करत असल्याचा आरोप थरूर यांनी केला. भारताच्या निर्वासित पुनर्वसन धोरणाअंतर्गत ते येथे आले आहेत. संरक्षण नसलेल्या लोकांना गुन्हेगार संबोधणे चूक असल्याचे थरूर म्हणाले. गृहमंत्र्यांनी निर्वासित धोरण आणावे आणि त्यानंतरच या मुद्द्यावर चर्चा करावी. परराष्ट्र मंत्रालयाकडे रोहिंग्या या म्यानमारमधून आलेल्या निर्वासितांसाठी १ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी आहे याकडे भाकप (मार्क्सवादी)चे खासदार ए. संपत यांनी लोकसभेचे लक्ष वेधले. 

२०१४-१५ मध्ये पत्रकारांवर हल्ल्याच्या १४२ घटना  
देशभरात पत्रकारांवर हल्ल्याच्या १४२ घटना समोर आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली.२०१५ मध्ये अशा २८ घटनांमध्ये ४१ लोकांना अटक करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. यावर उपाययोजना करण्यात येतील. 

इसिसच्या संपर्कात असलेल्यांवर कारवाई
पाकिस्तानमधील इसिस हस्तकांच्या संपर्कात असलेल्यांवर केंद्र कारवाई करणार असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी म्हटले आहे. राज्यांत केंद्राने संरक्षण नेटवर्क वाढवले असून पाकिस्तानी हस्तकांच्या संपर्कात असणाऱ्यांवर कारवाई होईल.

गेल्या वर्षभरात देशात ४०६ बॉम्बस्फोट  
गेल्या वर्षभरात देशात ४०६ बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या. यामध्ये ११८ लोकांना प्राण गमावावे लागले. राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या राष्ट्रीय बॉम्ब माहिती केंद्राने (एनबीडीसी) ही माहिती दिली असल्याचे केंद्रीय मंत्री गंगाराम अहिर यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...