आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Mahindra Excellence In Theatre Awards News In Marathi, New Delhi

बहुभाषिक मेटा नाट्यमहोत्सवाला दिल्लीत प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशभरातील उत्कृष्ट नाटकांची निवड करून त्याला मंच उपलब्ध करून देण्याचे काम, दि महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स (मेटा) गेल्या 8 वर्षांपासून करत आहे. या पुरस्कारांचे हे 9 वे वर्ष असून दिल्ली येथे मेटा नाट्यमहोत्सवाला सुरुवात झाली आहे. 8 मार्चपर्यंत चालणार्‍या या मेटा नाट्य स्पर्धेला पहिल्या वर्षी केवळ 10 प्रवेशिका आल्या होत्या. यंदा 300 पेक्षा जास्त नाटकांनी यात सहभाग घेतल्याची माहिती मेटाचे रवी दुबे यांनी दिली.


मराठी नाटकांना फाटा
‘मेटा’ नाट्य स्पर्धा दशकाच्या उंबरठय़ावर आहे. इंग्रजी, हिंदी, भोजपुरी, मल्याळम भाषांतील नाटके यात आहेत; पण मराठी नाटक का नसावे, हा प्रश्न आहे. मराठी रंगभूमीला कसदार अभिनय आणि दज्रेदार नाटकांची उज्ज्वल व दीर्घ परंपरा आहे. मराठी नाट्यकर्मी आणि नाट्यधर्मींची दिल्लीच्या एनएसडीपासून ते दूरदर्शनपर्यंतच्या पायाभरणीत नेहमीच अव्वल भूमिका राहिली आहे. मराठी रंगभूमीने आपला ठसा जगभरात उमटवलेला असताना ‘मेटा’त मात्र मराठी नाटकाची अनुपस्थिती खटकणारी आहे.

देशभरातून निवड प्रक्रिया
नाट्यलेखकांकडून प्रयोगाच्या डीव्हीडी मागवण्यात आल्या होत्या. 300 प्रवेशिकांचे ज्युरींनी परीक्षण केले. श्याम बेनेगल, शबाना आजमी, स्वाती भिसे, सुषमा सेठ, कुलभूषण खरबंदा, उत्कर्ष मुजुमदार या दिग्गजांचा ज्युरींत समावेश आहे.

मेटा पुरस्कारांची वर्गवारी
उत्कृष्ट निर्मितीसाठी 1 लाखांचा धनादेश व चषक. उत्कृष्ट नाट्यलेखनासाठी रुपये 75,000 चा पुरस्कार. दिग्दर्शन, कला-दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, अभिनय यातील विजेत्यांसाठी रुपये 45,000 चे पारितोषिक देण्यात येते .

अशी आहेत उत्कृष्ट नाटकं
‘गबरघीचोर’ हे हिंदी आणि भोजपुरी भाषेतील नाटक , प्रवीणकुमार गुंजन यांनी दिग्दर्शित केले आहे. पालकत्वाच्या वादात अडकलेल्या एका 15 वर्षीय मुलाचे हे कथासूत्र आहे. फराज खान दिग्दर्शित ‘ओपन कपल’ या इंग्रजी नाटकात नातेसंबंधाचे राजकारण मंचित केले आहे. ‘सी शार्प सी ब्लंट’, ‘मॅकबेथ ’, ‘मोमेंट जस्ट बिफोर डेथ’ (मल्याळम) , ‘ पिया बहरूपिया’,‘पुरुषसूक्ता’, ‘ 9 पार्ट्स ऑफ डिझायर ’ ही सर्व भारतभरातून निवडलेली नाटके या महोत्सवात सादर होणार आहेत. या सर्व नाटकांतून उत्कृष्ट नाटकाला मेटा पुरस्कार प्राप्त होईल.