नवी दिल्ली- जनता दल (यू) पक्षाचे राज्यसभेचे खासदार महेंद्र प्रसाद यांच्या बंगल्याच्या आवारातील झाडाला लागलेली दोन फणसे गायब झाल्याचे उघडकीस आले आहे. चोराला शोधण्यासाठी खासदार महोदयांनी संपूर्ण पोलिस यंत्रणाच कामाला लावले आहे. चोराला शोधण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे.
'इंडियन एक्सप्रेस'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चौकशी अधिकार्याने सांगितले की, फणसे चोरुन चोरट्याने ते पिकवून आतापर्यंत फस्त केली असतील. दोन्ही फणस जवळपास 10-10 किलो वजनाचे होते. तसेच चोरटा भुकेला असावा, त्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचा धक्कादायक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. दरम्यान, गेल्या गुरुवारी (19 जून) फणसे गायब झाल्याचे निदर्शनास आले. नंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. बंगल्यात काम करणार्या नोकरांची कसून चौकशी घेण्यात आली आहे. चौकशीतून काही महत्त्वपूर्ण पुरावेही हाती लागल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
खासदारांच्या बंगल्याच्या भिंतीवर व्यक्तिच्या पायांचे ठसे पोलिसांना आढळून आले आहेत. तसेच पोलिसांनी काही फिंगरप्रिंट्सही घेतले आहेत. 4, तुगलक रोड स्थित या बंगल्यात काम करणारे नोकर, माळी आणि सिक्युरिटी गार्ड्सची शुक्रवारी पोलिसांनी कसून चौकशी केली. तसेच त्यांच्या घरांची झाडाझडतीही घेण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी गुरुवारी रात्री उशीरा अज्ञात फणस चोराविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. खासदार महेंद्र प्रसाद यांचे स्वीय साहाय्यकांनी पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली होती. 'सफदरजंग लाइनमधील चार क्रमाकांच्या बंगल्यातील फणसाच्या झाडाला एकूण नऊ फणसे आले होते. 17 अथवा 18 जूनच्या रात्री नऊ पैकी दोन फणसे अज्ञात चोरट्याने लांबवले. याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात यावी', अशी मागणी तक्रारीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, आझम खान यांच्या लाडक्या म्हशी झाल्या होत्या गायब...