आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्या. ठाकूर मला इतके हँडसम वाटतात, तर महिलांना किती वाटत असतील? : न्या. खेहर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी आनंदी वातावरण होते. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या निरोपाची पार्टी ठेवली होती. बुधवारी सरन्यायाधीशपदाची शपथ घेत असलेले न्या. जे. एस. खेहर यांच्यासह बहुतांश न्यायमूर्ती, वकील व कर्मचारी उपस्थित होते. परंपरेनुसार आधी न्या. खेहर बोलले, नंतर न्या. ठाकूर. दोघांनीही थट्टा-मस्करी केली. ती त्यांच्याच शब्दांत...
 
‘मला न्या. ठाकूर यांच्या पहिल्या भेटीची आठवण येते. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात माझी व त्यांची पहिली भेट झाली होती. तेव्हा न्या. ठाकूर तेथे मुख्य न्यायमूर्ती बनले होते. ते साध्या कपड्यांत  होते. त्यांनी खादीचा शर्ट घातला होता. पण खूपच प्रसन्नचित्त होते. त्यांना पहिल्यांदा पाहिल्यावर माझ्या मनात दोन विचार आले. पहिला - हा माणूस किती देखणा ( हँडसम) आहे  आणि दुसरा - मी पुरुष असूनही ते मला एवढे देखणे वाटतात तर महिलांना किती देखणे वाटत असतील? ( सर्वच जण खदखदून हसू लागले.) त्यांनी नेहमीच मनाचे ऐकले. एका घटनेची आठवण येतेय... न्या. ठाकूर यांनी एका खटल्यात निकाल लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. मला ते प्रकरण कनिष्ठ न्यायालयातून खारीज होत आलेले अपील खारीज करण्यासारखे वाटले. न्या. ठाकूर माझ्या मताशी सहमत झाले नाहीत. बचाव पक्षाला पूर्ण संधी मिळालेली नाही, असे ते म्हणाले. शेवटी मला त्यांचा सल्ला मानावा लागला.  चंदिगडमध्ये त्यांना निरोप दिला जात होता तेव्हा आज आहे एवढीच गर्दी होती. त्या वेळी न्यायालयीन कर्मचारी न्या. ठाकूर पदोन्नतीवर सर्वोच्च न्यायालयात जात असल्यामुळे पंजाबी ढोल वाजवून नाचत होते. असे प्रेम फारच कमी लोकांना मिळते.

निवृत्तीनंतर आपल्या शेतात जाऊन ट्रॅक्टर चालवायला शिकायचे आहे, असे न्या. ठाकूर एकदा म्हणाले होते. तर कधी हीरो बनण्याची इच्छा आहे, असे मस्करीत म्हणाले होते. कधी ते लवादात रस दाखवतात. या तिन्हीपैकी त्यांना जे वाटते, ते त्यांना मिळो, एवढीच प्रार्थना!

७ वर्षांत २७ निरोप समारंभ पाहिले, पण एवढी गर्दी कधीच पाहिली नाही; ती नव्या सरन्यायाधीशांसाठीच आहे  : न्या. ठाकूर
मी ७ वर्षांत येथे २७ न्यायमूर्तींच्या निरोप समारंभात सहभागी झालो आहे. मात्र एवढी गर्दी कधीच पाहिली नाही. लोक नव्या सरन्यायाधीशांच्या स्वागतासाठी आले आहेत, याची मला जाणीव आहे. (त्यावर न्या. खेहर मस्करीत म्हणाले- सर्वात भीतिदायक सरन्यायाधीश जाताना पाहण्यासाठी आले आहेत.) असो... या वेळी मी युवा वकिलांना एक गोष्ट सांगू इच्छितो. परिश्रम हेच कोणत्याही वकिलाचे भांडवल असते. खूप परिश्रम करा आणि आपले पक्षकार, प्रतिस्पर्धी वकील व न्यायमूर्तींचा आदर प्राप्त करा.  काम करताना न्यायपालिकेच्या मर्यादांचे विशेष भान ठेवा. मी ४५ वर्षे वकील व न्यायमूर्ती म्हणून न्यायपालिकेशी संबंधित आहे. मी इथून बाहेर पडल्यावरही न्यायपालिका निर्भयपणे काम करताना पाहायला मिळावी, अशी माझी इच्छा आहे.  निवृत्त झाल्यावरही न्यायपालिकेसाठी काही करता आले तर जरूर करीन. माझ्या ४५ वर्षांच्या करिअरमध्ये  मी जे काही मिळवले, त्यासाठी मी  ईश्वर, आईवडील, गुरू, सहकारी व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धन्यवाद देतो. न्यायालयीन वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही धन्यवाद. त्यांनी मला कधीच मिसकोट केलेले नाही. न्यायालयात जे बोलले, त्याचे सत्य वार्तांकन केले.’ 
- न्या. टी.एस. ठाकूर (निवृत्त होत असलेले) 
बातम्या आणखी आहेत...