आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील 43 देश अधिकृतरीत्या धार्मिक, 27 देशांचा इस्लाम तर भारत धर्मनिरपेक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली  - जगातील सर्वात जास्त लोक ख्रिश्चन धर्माला मानतात. इस्लाम याबाबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुठलाही धर्म न मानणारे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पण अधिकृतरीत्या जगात सर्वाधिक देशांचा धर्म इस्लाम आहे. ही माहिती प्यू रिसर्च सेंटरद्वारे १९९ देशांच्या धर्माच्या आधारावर केलेल्या अभ्यासात समोर आली आहे. त्यात या देशांची घटना आणि कायद्यांचा अभ्यास करण्यात आला. धर्माबाबतच्या तरतुदी, धर्म मानणारे, समर्थक किंवा धर्मनिरपेक्ष देशांचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यानुसार, जगातील ४३ देशांनी स्वत:ला अधिकृतरीत्या धार्मिक देश घोषित केले आहे. त्यापैकी २७ देशांनी स्वत:ला इस्लामिक, तर १३ नी ख्रिश्चन म्हटले आहे.  
 
५० देश धार्मिक पक्षधर  
स्वत:ला धार्मिक घोषित केलेल्या ४३ देशांशिवाय ५० देश असे आहेत ज्यांची घटना धर्माला मान्यता देत नाही, पण समर्थन करतात. त्यात ख्रिश्चन धर्माच्या देशांची संख्या जास्त आहे. भारत, नेपाळसह १०६ देशांनी स्वत:ला धर्मनिरपेक्ष जाहीर केले आहे.  
 
अधिकृतपणे धार्मिक ४३ देशांपैकी ४० मध्ये इतर धर्मांशी भेदभाव  
इतर धर्मांशी भेदभाव करणाऱ्या देशांत बहुतांश मुस्लिम आहेत. कोमोरोस, मालदीव, मॉरितानियात नागरिकांना इस्लामचे पालन अनिवार्य आहे. लिचटेंस्टीन, माल्टा आणि मोनॅको ख्रिश्चन आहेत, पण इतर धर्मांनाही सर्व सरकारी फायदे मिळतात.  
 
जाॅर्डनमध्ये गैरमुस्लिमांना कुठलाही सरकारी फायदा दिला जात नाही  
जॉर्डन इस्लामी देश आहे. तेथे इतर धर्मीयांना सरकारी योजनांचे फायदे मिळत नाहीत. गैर-मुस्लिमांना मालमत्तेपासून विवाहापर्यंतची माहिती सरकारला द्यावी लागते. इस्लाम सोडून दुसरा धर्म अंगीकारणाऱ्यांची निगराणी होते.  
 
भूतान आणि कंबोडिया बौद्ध राष्ट्र, पण लाओस त्यापेक्षा मोठा समर्थक  
भूतान आणि कंबोडियाने स्वत:ला अधिकृतरीत्या बौद्ध राष्ट्र घोषित केले आहे. पण लाओस बौद्ध धर्माचा त्यांच्यापेक्षा मोठा समर्थक. त्याच्या घटनेत लिहिले आहे, ‘राज्य बौद्ध धर्म आणि इतर धर्मांच्या वैध कार्यक्रमांचा सन्मान आणि सुरक्षा करते.’  
 
 
चीन-क्युबासह १० देशांना घोषित धर्म नाही, पण धर्माबाबत कठोर  
चीन, क्युबा, उत्तर कोरियाचा अधिकृत धर्म नाही, पण सक्ती आहे. त्यात व्हिएतनाम, कझाकिस्तान, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तानही आहे. तेथे धार्मिक आयोजनावर कडक नियंत्रण आहे. चीनमध्ये फक्त ५ संघटनांना धार्मिक कार्यक्रमांची परवानगी आहे.  
 
४० देश कोणत्या ना कोणत्या धर्माचे समर्थक  
अधिकृत धर्माशिवाय ४० देश असे आहेत, जे अघोषितरीत्या कोणत्या ना कोणत्या धर्माचे समर्थन करतात किंवा त्यांना फायदा पोहोचवतात. त्यात सर्वात जास्त २८ ख्रिश्चन धर्म मानणारे आहेत. ते कोणत्या ना कोणत्या धर्माची बाजू घेणाऱ्या देशांच्या ७०% आहेत.  
- भारत आणि नेपाळ हिंदूबहुल देश आहेत, पण त्यांचा अधिकृत धर्म नाही.  
 
५९% इस्लामी देश उत्तर आफ्रिका, मध्य-पूर्वेत  
अधिकृतरीत्या इस्लाम धर्म घोषित करणारे २७ पैकी १६ देश मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत आहेत. त्याशिवाय बांगलादेश, ब्रुनेई आणि मलेशियासह ७ देश आशियात आहेत. कोमोरॉस, जिबौती, मॉरितानिया आणि सोमालिया हे इतर चार मुस्लिम देश आहेत. युरोप,अमेरिकेत कोणत्याही देशाने स्वत:ला मुस्लिम जाहीर केले नाही.  
 
ब्रिटनसह ख्रिश्चन धर्माचे १३ पैकी ९ देश युरोपात  
स्वत:ला धार्मिक घोषित करणारे १३ म्हणजे सुमारे ३०% देश ख्रिश्चन आहेत. त्यापैकी ब्रिटन, डेन्मार्क, मोनॅको आणि आइसलँडसह ९ देश युरोपातील आहेत. कोस्टा रिका, डॉमिनिकन रिपब्लिक अमेरिका भागात येतात. आशिया-प्रशांत क्षेत्रात तुवालू हा एकमेव ख्रिश्चन देश आहे. सब-सहारा आफ्रिकेच्या ५ देशांत झांबिया एकमेव ख्रिश्चन देश आहे.  
 
 
 
बातम्या आणखी आहेत...